टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणआर आहे. यादरम्यान सोशल मीडियवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: May 6, 2024, 02:20 PM IST
टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक title=

T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या (Team India) मिशन 'टी20 वर्ल्ड कप'ला  (T20 World Cup 2024) 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला चार आठवड्यांचा अवधी बाकी आहे, भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट संघही जाहीर केलाय. या दरम्यान बीसीसीआयकडून स्पर्धेच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे. यासाठी बीसीसीआयने काही अधिकाऱ्यांना अमेरिका दौऱ्यावर पाठवलं होतं. अमेरिकेत टीम इंडियाचं सराव शिबिर आणि इतर सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी हा दौरा होता. 

टीम इंडियाच्या जर्सीचा लूक
बीसीसीआयकडून तयारीचा आढावा घेतला जात असतानाच आता नवी माहिती समोर आली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया नव्या जर्सीत (Team India New Jersey) मैदानात उतरणार असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या नव्या जर्सीचा पहिला लूक व्हायरल झाला आहे. 

कशी आहे टीम इंडियाची नवी जर्सी?
सोशल मीडियावर व्हायरल होणारी टीम इंडियाची नवी जर्सी व्ही शेप गळ्याची असू यावर भारतीय तिरंग्याचा स्ट्रीप आहे. खांद्यापासून हातापर्यंत भगवा रंग आहे. यावर सफेद पट्ट्या आहेत. जर्सीची पुढची बाजू निळ्या रंगाची असून यावर उजव्या बाजूला आदिदास आणि डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची ही अधिकृत जर्सी असल्याचा दावा या व्हायरल फोटोबरोबर करण्यात आला आहे. 

क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया
टीम इंडियाची ही नवी जर्सी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी टीम इंडियाची ही नवी जर्सी फारशी पसंत पडलेली दिसत नाही. अनेकांनी नव्या जर्सीच्या डिझाईनवर नापसंती व्यक्त केली आहे. टीम इंडियाची ही जर्सी अधिकृत नसून सराव शिबिरासाठी असल्याचा दावाही काही जणांनी केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आदिदास भारतीय संघाचा ऑफिशिअल किट स्पॉन्सर आहे. कंपनीकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, बीसीसीआयने भारताची 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.  रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जायसवाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.