कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा

कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून  24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 19, 2024, 09:39 PM IST
कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा  title=

Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे. 

रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही 24 तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात (Intenation Market) अतिशय महत्त्व आहे. बाजारामध्ये जवळपास 5 ते सहा हजार रूपये किलो दरानं रक्तचंदनाची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे.. उंची दारू, आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी रक्तचंदनाचा वापर होतो. तसंच सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती आयुर्वेदात आढळते. त्यामुळेच या झाडाला कोट्यवधी रुपयांची किंमत असते. 

कोकणात हे झाड आलं कसं
कोकणच्या देवराईत दीडशे वर्षांचं हे झाड डौलात उभं आहे. पण इथे हे रक्तचंदनाचं झाड आलं कसं याची माहिती कोणाकडेच नाही.  जंगलात खोलवर ही झाडं सापडतात. रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. 

खूप वर्षांपूर्वी कोकणातला कातकरी समाज जंगलात जायचा. त्यांच्या बैलाची प्रकृती बिघडली की हा समाज या झाडाची साल उगाळून बैलाला देत असतं, त्यानंतर बैल ठणठणीत होत असल्याने हे झाड औषधी आहे अशी ख्याती कोकणात पसरली. हे झाड तोडण्याचाही प्रयत्न झाला. पण हे झाड औषधी आणि दुर्मिळ असल्याने तोडायचं नाही असा निर्णय एकमुखाने घेतला गेल्याचं इथले गावकरी सांगतात. काही अभ्यासकांनी यावर अभ्यास करत हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं सांगितलं. पण हे झाड कुणी लावलं, इथं कसं आलं याची काहीच माहिती नाही, पक्षाच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांच्या काळात हे झाड लावलं गेलं असावं असा अंदाज असल्याचं गावकरी सांगतात. 

झाडाला 24 तास सुरक्षा
झाडाची ख्याती पसरल्यानतंर हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर पोलीस, गावकरी आणि महसुलविभागामार्फेत ठराविक अंतराने या ठिकाणी गस्त घातली जाते. महसुल विभागाचं या झाडावर विशेष लक्ष असतं.