रिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...'

आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) स्थान न देण्यात आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2024, 09:35 PM IST
रिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...' title=

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यांच्या संघात सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगला स्थान दिलेलं नाही. आयीएलमध्ये रिंकू सिंगने जबरदस्त कामगिरी केली असल्याने त्याचा समावेश न करण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. भारतीय टी-20 संघातून खेळतानाही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रिंकू सिंगला राखीव ठेवण्यात आलं असून, शिवम दुबेला संघात घेतलं आहे. दरम्यान रिंकू सिंगला 15 सदस्यांमध्ये स्थान न देण्याच्या निर्णयावर बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी भाष्य केलं आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी रिंकूने काहीही चुकीचं केलं नसल्याचं स्पष्ट केलं. संघाची रचना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळेच अक्षर पटेलसारख्या अष्टपैलू खेळाडूला प्राधान्य देण्यात आलं असं अजित आगरकर म्हणाले आहेत. "या विषयावर चर्चा करणं आमच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट होती. त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही. अगदी शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केलेली नाही. हे संयोजनांबद्दल आहे. रोहितला आणखी पर्याय देण्यासाठी काही रिस्ट स्पिनर्सचा समावेश आहे. हे केवळ दुर्दैवी आहे. तो रिझर्व्हमध्ये आहे, त्यामुळे तो 15 सदस्यांच्या संघाच्या किती जवळ आला हे स्पष्ट बोतं. पण अखेरीस तुम्ही फक्त 15 खेळाडूंना संघात निवडू शकता," असं अजित आगरकर म्हणाले.

T20 WC: 'तो फार दुखावला आहे, त्याने फोन करुन...,' रिंकू सिंगच्या वडिलांनी केला खुलासा, 'सर्व मिठाई, फटाके...'

 

अजित आगरकर यांनी यावेळी हार्दिक पांड्याची भूमिका आणि उप-कर्णधारपद यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "उपकर्णधारपदाच्या संदर्भात काहीही चर्चा झाली नाही. तो दीर्घकाळानंतर परत येत आहे. त्याने मुंबईसाठी सर्व सामने खेळले असून, वर्ल्डकपचा पहिला सामना खेळेपर्यंत आणखी एक महिना असल्याने थोडा वेळ मिळाला आहे. आशा आहे की तो फॉर्ममध्ये असेल. हार्दिक पांड्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्याचा फिटनेस थोडा चिंतेचा विषय आहे, पण आतापर्यंत तो आयपीएलमध्ये चांगला खेळला आहे".

T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ: 

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.