अफगाणिस्तानला रडीचा डाव खेळून Asia Cup मधून बाहेर काढलं? कोचचा धक्कादायक खुलासा, NRR वरुन वाद पेटला

श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) संघ आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकाने आपली फसवणूक झाली असल्याचा दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 6, 2023, 11:58 AM IST
अफगाणिस्तानला रडीचा डाव खेळून Asia Cup मधून बाहेर काढलं? कोचचा धक्कादायक खुलासा, NRR वरुन वाद पेटला title=

आशिया कपमध्ये मंगळवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने आले असता प्रेक्षकांना थरारक सामना पाहण्यास मिळाला. श्रीलंकेने 291 धावांचं आव्हान समोर ठेवलं असता अफगाणिस्तानने सुपर 4 फेरीत पात्र होण्यासाठी 39 ओव्हर्समध्ये हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण अफगाणिस्तान 37.4 ओव्हर्समध्ये 289 धावांवर ऑल आऊट झाला. विजयासाठी अफगाणिस्तान संघाला फक्त 3 धावा कमी पडल्या. पण सामन्यानंतर नेट रन रेटवरुन वाद पेटला आहे. आम्हाला सामना अधिकाऱ्यांनी सुपर 4 फेरीत पात्र होण्यासाठी नेमकं काय गणित होतं याची योग्य माहिती दिली नसल्याचा दावा अफगाणिस्तान करत आहे. 

अफगाणिस्तानने 37.1 ओव्हरमध्ये 292 धावा करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन आशिया कपमधील त्यांचं आव्हान कायम राहील. पण यावेळी त्यांना याची कल्पना नव्हती की, जरी त्यांनी 37.1 ओव्हरमध्ये 292 धावा केल्या नसत्या तरी त्यांच्याकडे सुपर 4 फेरीत पात्र होण्याची संधी होती. 

37 ओव्हर्स संपल्या तेव्हा अफगाणिस्तानच्या 8 बाद 289 धावा होत्या. पात्रता अटीचा अर्थ असा होता की, त्यांना श्रीलंकेच्या नेट रन रेटला आव्हान देण्यासाठी एका चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या.

धनंजया डी सिल्वाच्या गोलंदाजीवर मुजीब उर रहमानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि लाँग-ऑन बाऊंड्रीवर झेलबाद झाला. यानंतर दुसऱ्या बाजूला असणारा राशीद खान निराश होऊन गुडघ्यावर खाली बसला होता. आपलं आशिया स्पर्धेतील आव्हान संपलं असं त्यांना वाटत होतं. पण खरं तर तसं नव्हतं. नंतर अशी माहिती मिळाली की, अफगाणिस्तानने 37.2 षटकात 293, 37.3 षटकात 294, 37.5 षटकात 295, 38 षटकात 296 किंवा 38.1 षटकांनंतर 297 धावा केल्या असत्या तर त्यांनी नेट रन रेटमध्ये श्रीलंकेला मागे टाकलं असतं. 

अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी सामन्यानंतर बोलताना आपला संघाला नेट रन रेटच्या गणिताची कल्पना नव्हती असं स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, आपल्या संघाला सामना अधिकाऱ्यांनी नेट रन रेटच्या बाबतीत योग्य माहिती दिली नव्हती असा आरोप केला. याचा अर्थ अफगाणिस्तानला सुपर 4 फेरीत पात्र होण्यासाठी आपण 37.1 पेक्षा जास्त ओव्हर्स खेळू शकतो याची कल्पना नव्हती. 

जोनाथन ट्रॉट यांनी सांगितलं की "आम्हाला नेट रन रेटचं गणित नीट समजावून सांगण्यात आलं नव्हतं. आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की, सुपर 4 मध्ये पात्र होण्यासाठी 37.1 ओव्हरमध्ये सामना जिंकायचा आहे. आम्हाला त्या ओव्हर्सबद्दल सांगण्यातच आलं नाही ज्यमध्ये 295, 297 धावा करु शकलो असतो. 38.1 ओव्हर्सबद्दल आम्हाला कधीच सांगितलं नाही".

श्रीलंकेने अफगाणिस्तानला 292 धावांचं आव्हान दिलं होतं. याच्या उत्तरात अफगाणिस्तानने 37.4 ओव्हर्समध्ये 289 धावा करत सर्वबाद झाला. राशीद खान 16 चेंडूंमध्ये 27 धावा करत नाबाद राहिला. पराभूत झाल्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले होते. 

असं होतं समीकरण, ज्यापासून अफगाणिस्तान संघ अनभिज्ञ राहिला

- 37.3 षटकात 294 धावा 
- 37.4 षटकात 295 धावा 
- 38 षटकात 296 धावा 
- 38.1 षटकात 297 धावा 

टॉस उडवून झाला असता निर्णय

अफगाणिस्तानने 37.5 षटकांत 295 धावा केल्या असत्या तर अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा नेट रन रेट समान झाला असता. अशा स्थितीत नाणेफेक करत कोणता संघ पुढच्या फेरीत जाणार याचा निर्णय झाला असता. अफगाणिस्तानला 291 धावसंख्येची बरोबरी करण्यासाठी 38.1 खेळता आली असती आणि नंतर एक षटकार लगावता आला असता.