ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तर

Maharashtra News Today:  झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 2, 2024, 09:01 AM IST
 ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तर title=
uddhav thackeray gave cm offer to fadnavis shocking To The Point Interview With Devendra Fadnavis

Maharashtra News Today:  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत केला आहे. फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. 2022च्या सत्तास्थापनेवेळी नक्की काय घडलं? असा प्रश्न आता उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाला शिंदे गटाच्या आमदारांनेही दुजोरा दिला आहे. मात्र, ठाकरे गटाच्या आमदाराने हा दावा फेटाळला आहे. 

ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला आहे. फडणवीसांना गौप्यस्फोट करायला इतका वेळ का लागला आणि ते आत्ताच का होतात? असा सवाल आहिर यांनी केला आहे. 'हा संपूर्ण घटनाक्रम होऊन दोन ते अडीच वर्ष झाले आहेत. वारंवार त्यांनी मी खरं बोलतोय अशी भूमिका मांडत असतानाही अनेक गौप्यस्फोट केलेत. आताच हे बोलणे म्हणजे टायमिंग मॅच करुन. त्यांनाही हे लक्षात आलंय की त्यांची विश्वासार्हता इतकी राहिली नाहीये. त्यामुळं वारंवार त्यांच्याकडून नवीन नवीन मुद्दे काढण्याचा सोपस्कार होतोय,' असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. 

'फडणवीस बोलताना हे देखील बोलले आहेत की आता जे आमच्यासोबत आले आहेत त्यांच्यासोबत आम्ही गद्दारी काढणार नाही. मग ज्यावेळी तो दिलेला शब्द आहे तो पाळला असता तर ही वेळ पण आली नसती. त्यांच्या या गोप्यस्फोटाला आमच्या दृष्टीकोनातून महत्त्व द्यायला हवे, असे मला वाटत नाही. इथे गौप्यस्फोट करण्यापेक्षा लोकांच्या समोर जाऊन ते सांगायला हवे होते. त्यांनी त्यावेळी सांगितले नाही आणि आत्ताच हे सांगण्याची वेळ का आली आहे,' असा सवाल सचिन आहिर यांनी उपस्थित केला आहे. 'त्यांचे असलेले मित्रपक्ष किंवा नवीन आलेले मित्रपक्ष आहेत त्यांच्यात असलेले विसंगती स्थिर करण्यासाठी हा गौप्यस्फोट आहे का, असाही प्रश्न पडतो,' असं सचिन आहेर यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी जो गौप्यस्फोट केला हे आत्ताच त्यांना का बोलावं लागतं. त्यावेळी त्यांना कोणी थांबवले होतं का? ते का बोलले नाही?, असे सवाल सचिन आहिर यांनी उपस्थित केले आहेत. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला. तेव्हा त्यांनी बंडखोरांना का सोबत घेताय, असा प्रश्न केला. शिंदेंना एखादं पद तुम्ही का देताय, असा सवालही त्यांनी केला. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, अशी ऑफर तेव्हा ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचं मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.