'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 28, 2024, 08:54 AM IST
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..' title=
राऊत यांनी साधला भाजपा समर्थकांवर निशाणा

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधतानाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 हून अधिक जागांवर सहज विजय मिळेल असं भाकित व्यक्त केलं आहे. कोणत्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागेल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री नारायण राणे यांनाही आपल्या 'रोखठोक' सदरामधून शाब्दिक चिमटे काढले आहेत.

मुसलमान आणि आंबेडकरी मतं महाविकास आघाडीच्या पाठीशी

"मुसलमान आणि आंबेडकर विचारांचा मतदार पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र आशादायी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काही ठिकाणी उभे केले. 2019 प्रमाणे मुस्लिमांची साथ त्यांना मिळणार नाही. कारण देशभरातील मुस्लिम मतदार हा ‘इंडिया’ आघाडीच्या मागे उभा राहील व एमआयएमसारखे मुस्लिम मतांचे ठेकेदार या वावटळीत उडून जातील. रामदास आठवले यांचे अस्तित्व या निवडणुकीने पूर्ण नष्ट केलेले दिसते. आठवल्यांच्या चारोळ्याही त्यामुळे बंद झाल्या. 2019 च्या निवडणुकीने महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचा आणि वतनदारांचा निकाल लावलेला दिसेल," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्रींच्या पुत्र पराभवाच्या छायेत

संजय राऊत यांनी, "दक्षिण नगर मतदारसंघात नीलेश लंकेसारखा एक फाटका उमेदवार विखे-पाटलांचा पराभव करेल हे नक्की. नाशकात भुजबळांनी आधीच माघार घेतली. बारामतीत सुनेत्रा अजित पवारांचे काहीच चालणार नाही. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पराभवाच्या छायेत आहेत. सातारा ‘राजां’ना सोपा नाही व कोल्हापुरात शाहू महाराजांची निवडणूक एकतर्फी होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या सोबत आले. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे व ‘माढा’ मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते विजयी होतील. भारतीय जनता पक्षाला अशा अनेक मतदारसंघांत दारुण पराभवास सामोरे जावे लागेल," असा विश्वास व्यक्त केला आहे.

'राणे जेवढे ‘मोदी मोदी’ करतील तेवढा..'

"महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीस सहज मिळतील. मोदी व शहा यांच्या सभांचा आणि प्रचाराचा बार फुसकाच ठरला. कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील हे आताच नक्की झाले. उद्धव ठाकरे यांनी कोकणात येऊन मोदींवर टीका करून दाखवावी, असे थुकरट पद्धतीचे आव्हान राणे देत आहेत. राणे व त्यांच्या मुलाचा तीन वेळा पराभव शिवसेनेने कोकणातच केला. मोदी यांच्या प्रेमात कोकणी जनता कधीच नव्हती. त्यामुळे राणे जेवढे ‘मोदी मोदी’ करतील तेवढा राणे यांना फटका बसेल. संपूर्ण राज्यात मोदींविरुद्ध वातावरण आहे. महाराष्ट्र देशाला नेहमीच दिशा दाखवतो, ती दिशा या वेळी महाराष्ट्र दाखवेल," असं राऊत म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

राज ठाकरे भाजपाचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग

"उद्धव ठाकरे व शरद पवार यांना पुत्रप्रेम व कन्याप्रेम नडले. त्यामुळेच त्यांचे पक्ष फुटले, असे विधान अमित शहा करतात ते कशाच्या आधारावर? स्वतःचा कंडू शमविण्यासाठी महाराष्ट्रावरील आकसापोटी मोदी-शहांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची शकले केली, कुटुंबे फोडली. भाजपच्या राजकीय घसरणीस ताळतंत्र उरला नाही व आता शेजेवर कोणीही चालते अशी त्यांची स्थिती महाराष्ट्रात झाली," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. पुढे बोलताना राऊत यांनी, "राज ठाकरे हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले, पण उत्तर प्रदेश-बिहारात त्याचा फटका बसेल," असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

शिंदे- अजित पवारांकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा नाही

"अशोक चव्हाण, अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात फायदा होणार नाही. अजित पवार यांच्या गटास लोकसभेची एकही जागा मिळणार नाही. बारामतीत सुनेत्रा पवार व रायगडात सुनील तटकरे यांचा दारुण पराभव होत आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्वही लोकसभा निवडणुकीनंतर राहील काय? हा प्रश्न आहे. शिंदे यांच्या वाट्याला 16 जागा आल्या. त्यांच्या पाच खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली. खरी शिवसेना म्हणणाऱ्यांची ही अवस्था! ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला व शिंदे काहीच करू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत भाजपने हे करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे राहिले. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही," असं राऊत म्हणाले.