मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात

Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 28, 2023, 08:49 AM IST
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात title=

Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. यासंबंधी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर पाणीकपात लागू केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

मुंबई पाणी पुरवठ्यासाठी मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांवर अवलंबून असते. या धरणांमधून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. पण यावेळी मान्सून लांबल्याचा फटका या धऱणांना बसला आहे. या धरणांमध्ये सध्या फक्त 100873 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 6.97 टक्के पाणी शिल्लक आहे. पण मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात 14 लाख 47  हजार 343 दशलक्ष लिटर पाणीसाठा असणं गरजेचं आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मान्सूनआधी प्रचंड उष्णता असल्याने हा धरणातील पाणी जलदगतीने आटत होतं. दरम्यान धरणातील पाणीसाठा खालावला असल्याने राज्य सरकारने भातसा व अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाचं लक्ष धरणक्षेत्रातील पावसाकडे लागून आहे. जर पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचं संकट आणखी गहिरं होण्याची शक्यता आहे. 

सध्याचा पाणीसाठा किती आहे (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर - 34347 (26. 64 टक्के)
तानसा - 32654 (22.51 टक्के)
मध्य वैतरणा - 18415 (9.52 टक्के)
भातसा - 6314 (0.88 टक्के)
विहार - 6830 (24.66 टक्के)
तुळशी - 2314 (26.76 टक्के)

एक टक्का पाणी तीन दिवस पुरते !

मुंबईला दररोज 2850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे धरणातील एक टक्का पाणी साधारण तीन दिवस पुरतं. 

पावसाचा इशारा

येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून (Monsoon News) महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्याला ऑरेंज (Orange alert) आणि यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे (Pune Rain News), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्षा, जालना, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.