'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यानंतर स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 19, 2024, 12:50 PM IST
'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा title=

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल मारहाण प्रकऱणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) यांच्या पीएला अटक करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले असून, भाजपा कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. शनिवारी अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला (BJP) अटक कऱण्याचं आव्हान दिलं होतं. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या निर्णयावर स्वाती मलिवाल यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं म्हणणं मांडलं असून इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हटलं आहे. 

स्वाती मलिवाल यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "एका काळी आम्ह सर्वजण निर्भयाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत होतो. पण आज 12 वर्षांनी अशा आरोपीला वाचवण्यासाठी उतरले आहेत ज्याने सीसीटीव्ही फुटेज गायब केलं आणि फोन फॉरमॅट केला? इतकी ताकद मनिष सिसोदिया यांच्यासाठी लावली असती तर बरं झालं असतं. आज ते इथे असते तर कदाचित इतकं वाईट झालं नसतं". स्वाती मलिवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. पण त्यांचा निशाणा अरविंद केजरीवाल यांच्याकडे असल्याचं स्पष्ट दिसत आहे.  

अरविंद केजरीवालांची भाजपावर स़डकून टीका

निषेध मोर्चाच्या आधी अरविंद केजडरीवाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. भाजपाला येत्या काही वर्षात आपल्यासाठी कठीण स्पर्धा असेल असं वाटत असल्याने ते आम आदमीला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

"या भाजपवाल्यांनी ऑपरेशन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपचे लोक खूप वेगाने प्रगती करत असल्याचं म्हटलं आहे. हे आपल्य़ा पंतप्रधानांचे शब्द आहेत. ते म्हणत आहेत की हे लोक वेगाने वाढत आहेत, लोक त्यांच्या कामाबद्दल बोलत आहेत. येत्या काही वर्षात भाजपाला ते कडवी झुंज देऊ शकतात," असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

“ऑपरेशन झाडू अंतर्गत, आप नेत्यांना अटक केली जात आहे. 'आप'ची खाती जप्त केली जातील. मी खोटं बोलत नाही... ते आता निवडणुकांमुळे जप्त करणार नाहीत. पण मतदानानंतर जप्तीला सुरुवात करतील आणि आपचे कार्यालय बंद करतील. आपला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न असेल. त्यांना वाटतं की त्यांनी आप आणि त्यांचे नेते संपवले. पण हा पक्ष करोडो लोकांचा विचार आहे," असं केजरीवाल म्हणाले आहेत.