नामुष्की! भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत, जागतिक कुस्ती संघटनेची मोठी कारवाई

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 27 एप्रिलला एका पॅनेलची नियुक्ती केली होती. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेने निवडणुका घेण्यासाठी मुदत दिली होती. पण मुदतीत निवडणूका न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 24, 2023, 04:24 PM IST
नामुष्की! भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत, जागतिक कुस्ती संघटनेची मोठी कारवाई title=

UWW Suspends WFI: जागतिक कुस्ती संघटनेने ( United World Wrestling federation) मुदतीत निवडणूक न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघाचं (Wrestling federation Of India) सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याचा मोठा फटका भारतीय कुस्तीपटूंना बसलाय. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत. 16 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठीही महत्तावाची असणार आहे. 

तिरंग्याखाली सहभागी होऊ शकणार नाही
भूपेंद्र सिह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला 45 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या आदेशाचं पालन करण्यास समिती अयशस्वी ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीचं कामकाज पाहण्यासाठी 27 एप्रिलला एका समितीची स्थापना केलीहोती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 एपिलला जागतिक कुस्ती संघटनेने निवडणूक मुदत वेळेत न घेतल्यास कारवाईचा इशारा दिला होता. पण यानंतरही भारतीय कुस्ती महासंघाने याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्तयता रद्द केली आहे. 

जागतिक कुस्ती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार भारतीय कुस्ती महासंघाला 45  दिवसांत म्हणजे 15 जुलैपर्यंत निवडणूक घ्यायची होती. सात मे रोजी निवडणूक घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. पण क्रीडा मंत्रालयाने या प्रक्रियेला मान्यता दिली नाही. 

ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोप
भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हे प्रकरण चांगलंच गाजलं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सर्व पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तसंच कुस्ती महासंघाच्या निवडणुकसाठी जम्मू-काश्मिर हायकोर्टाचे माजी न्यायाधीश एम एम कुमार यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केलं. 

11 जुलैला निवडणूक निश्चित करण्यात आली. पण आसाम कुस्ती संघटनेने निवडणुकीसाठी मान्यता मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत निवडणूकीवर स्थगिती आणली. त्यानंतर 12 ऑगस्टची निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली, पण त्यावेळी हरियाणा कुस्ती संघटनेने कोर्टात धाव घेत निवडणूकीवर स्थगिती आणली. 

भारताच्या दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी ब्रिजभूषण हे अध्यक्ष होते. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले  होते. याची दखल घेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भूपेंदर सिंह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.