विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 8, 2024, 07:58 PM IST
विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला title=

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका (India vs England Test Series) खेळवली जात आहे. यापैकी दोन कसोटी सामने खेळवण्यात आले असून तीन सामने बाकी आहेत. या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. पुढच्या तीन सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची (Team India) घोषणा केली जाणार आहे. पण सामन्यातही  विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. 

विश्वचषकानंतर मोठा ब्रेक
केवळ इंग्लंडविरुद्धचीच मालिका नाहीतर आयसीस एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर (ICC World Cup 2023) म्हणजे 19 नोव्हेंबर 2023नंतर विराट कोहलीने टीम इंडियातून मोठा ब्रेक घेतला आहे. गेल्या चार महिन्यात विराट कोहली केवळ चार आंतरराष्ट्रीय सामनेच खेळला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका, 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका झाली. याशिवाय अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिकाही खेळवली गेली. आणि आता इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 

म्हणजे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सतरा सामन्यांपैकी विराट कोहली केवळ चार सामने खेळलाय. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी20 सामन्यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यात विराट चार आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 

विराट कोहली का ब्रेक घेतोय?
विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे टीम इंडियातून ब्रेक घेतल्याचं सांगितलं जात आहे. 11 जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी20 सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या मुलीचा वाढदिवस होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही विराटने ब्रेक घेतला आहे. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असून कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय त्याने घेतला. सध्या विराट कोहली पत्नी अनुष्का आणि लेकीबरोबर लंडनमध्ये आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार?
विराट कोहली टी20 विश्वचषकात खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण टी20 विश्वचषकाआधी केवळ आयपीएल बाकी आहे. आता प्रश्न असा आहे की विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यातून ब्रेक घेतला, पण आयपीएलच्या पूर्ण हंगामासाठी तो उपलब्ध असणार का? पुढच्या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मे महिन्यापर्यंत आयपीएल सुरु होणार आहे. त्यानंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.