'भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट'

 भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Updated: Jan 18, 2020, 07:38 PM IST
'भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट' title=

दीपक भातुसे / अमित जोशी, मुंबई : भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनीच केलेल्या वक्तव्यावरुन ४८ तासांत घुमजाव करावे लागले आहे. मात्र, मेगाभरतीच्या निमित्ताने भाजपमधील जुने कार्यकर्ते, नाराज कार्यकर्ते यांना पक्षातील सद्यस्थितीबद्दल बोलण्याची संधीच मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभारती ही एक चूक होती, यामुळे भाजपची संस्कृती बिघडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मी आधीपासून याला विरोध करत होतो. आता ही मेगाभरती चुकीची होती, हे जाणवत आहे. या मेगाभरतीमुळेच भाजपला पराभवाचा अनेक ठिकाणी सामना करावा लागला आहे. पक्षातील लोकांना संधी मिळाली असती तर आज राज्यात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, असा समाचार खडसे यांनी घेतला आहे.

थोडक्यात सत्ता हातातून गेलेल्या भाजपमध्ये सुरुवातीला व्यक्त झालेल्या नाराजी नाट्यानंतर आता नव्या लोकांबद्दल नाराजी सूर उमटू लागल्याचं दिसु लागलं. पक्षात वाढलेली अस्वस्थतता लक्षात घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर सावरासावर करण्याची वेळ आली. एकीकडे पक्ष सत्तेबाहेर आहे, त्यामुळे पक्षात नैराश्यचे वातावरण आहे, याचा परिणाम संघटनात्मक निवडणुका रखडण्यावर झाला आहे. त्यातच पक्षात बाहेरून आलेल्या लोकांबद्दल कुजबुज सुरु झाली आहे. थोडक्यात राज्यात सर्वात जास्त आमदार असलेल्या, सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेल्या भाजपमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत, भाजपामध्ये आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे.

मेगाभरती करताना काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षात प्रवेश दिला. यावेळी या बाहेरील नेत्यांचं स्वागत करताना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष आता संपणारच असे चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं आणि दुसरं म्हणजे आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील हे दिग्गज नेते आल्याने पक्ष जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास या नेत्यांना होता.

मात्र, त्याचवेळी या मेगाभरतीमुळे पक्षातील काही जण नाराज होते. ज्यांची संधी या मेगाभरतीमुळे हिरावली गेली किंवा ज्यांना ही मेगाभरती पटत नव्हती ते नेते नाराजी व्यक्त करत होते. मात्र उघडपणे कोणीही बोलायला तयार नव्हते. भाजप सत्तेपासून दूर राहिल्यानं आता ही नाराजी समोर येत आहे असं म्हणावं लागेल. मेगाभरतीचे सर्व निर्णय तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. आता मात्र मेगाभरती चूकच होती असं सांगून चंद्रकांत पाटील यांनी तेव्हाच्या फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्हं लावलं असल्याचं बोललं जात आहे.

मेगाभरतीद्वारे भाजपामध्ये आलेले चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याने निश्चितच नाराज होणार आहेत. मात्र त्यांची नाराजी वाढून पक्षाची डोकेदुखी आणखी वाढू नये याची काळजी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. चंद्रकात पाटील यांच्या कबुलीमुळे भाजप विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांनी आता भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. चूक लक्षात आली आहे तर मेगाभरती केलेल्या सगळ्यांची हकालपट्टी करा असा थेट टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. कारण मेगाभरतीत सगळ्यात जास्त राष्ट्रवादी पक्ष फुटला होता. 

भाजप पुन्हा सत्तेत आला असता तर मात्र याबाबत कुणीही काहीही बोललं नसतं. कारण विजयाच्या आड सगळं झाकलंं जातं. मात्र पराभवानंतर आत्मपरीक्षण करताना चुका समोर येतात. तशी मेगाभरतीची चूक आता पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना तिकीट नाकारून आधीच त्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. आता फडणवीस यांच्या धोरणावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केल्यानं शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपत सारं काही आलबेल नाही हेच स्पष्ट होत आहे.