70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?

Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत. 

Updated: Jan 31, 2024, 01:42 PM IST
70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय? title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक :  नाशिक शहरातील बडे व्यवसायिक आणि ठेकेदारांनी कर बुडवल्याच्या संशयावरून मुंबईतलं आयकर विभगाचे (Income Tax Department) पथक आज पहाटे नाशिकमध्ये (Nashik) दाखल झालं आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक तसंच सरकारी ठेकेदारांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविल्याचा संशय असल्याने हि कारवाई केली असल्याच म्हटलं जात आहे.

गुप्तता पाळून मोठा फौजफाटा शहरात दाखल 
नाशिक शहरात कोणालाही न कळू देता आयकर विभागाने गोपनीय पद्धतीने  हि कारवाई केली आहे. या कारवाईसाठी साधारण 70 वाहनांमध्ये मुंबई (Mumbai) येथील 150  अधिकाऱ्यांचे पथक छत्रपती संभाजी नगर इथं दाखल झाले. याठिकाणी अधिकाऱ्यांना जालना येथे कारवाई करायची असल्याच सांगण्यात आलं. मात्र आज पहाटे हे पथक नाशिकमध्ये दाखल झाल आहे.  पहाटे अचानक शहरात साधारण 15 ते 20 ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्या महिन्यातील तिसरी कारवाई
दहा महिन्यातील नाशिक शहरात आयकर विभागाची हि तिसरी कारवाई आहे. एप्रिल 2023 मध्ये नाशिक शहरात आयकर विभागाने राज्यातील सर्वात  मोठी कारवाई केली होती. हि कारवाई सलग सहा दिवस चालली होती. या कारवाईत राज्यातील 225 आयकर अधिकाऱ्यांच पथक होतं. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले होते. तर तीन कोटीची रोकड आणि अडीच कोटींचे दागिने आयकर विभागाने जप्त केले होते. 

एप्रिल नंतर लगेचच म्हणजे दोन जून 2023 मध्ये आयकर विभागाने शहरात पुन्हा छापे टाकले होते. हि कारवाई बोगस ट्रेडिंग झाल्याच्या संशयावरून करण्यात आली असल्याच म्हटलं जात. शहरातील बांधकाम व्यवसायिक आणि चार्टर्ड अकाऊंटंटवर हि कारवाई करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात झालेल्या कारवाईत मिळून आलेल्या माहितीच्या आधारावर हे छापे टाकण्यात आले असल्याच म्हटलं जात.

 4 कंत्राटदार आणि 10 बिल्डर अशा 14 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. या कंत्राटदाराने माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे एकत्रीकरण करून ते काम आपल्याकडे घेतलं. त्यानंतर उपकंत्राटदारांमार्फत ते इतरांना वाटप केलं. या कामात मोठा व्यवहार झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात विविध कंत्राटदारांनी तक्रारी केल्या होत्या. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.