7 दिवस सतत बलात्कार, अंगावर ओतली गरम डाळ; मित्रानेच केला तरुणीचे हाल अन् अखेर...; डॉक्टरही हादरले

Crime News: पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्या शरीरावर एकूण 20 जखमा होत्या. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 7, 2024, 01:12 PM IST
7 दिवस सतत बलात्कार, अंगावर ओतली गरम डाळ; मित्रानेच केला तरुणीचे हाल अन् अखेर...; डॉक्टरही हादरले title=
(प्रातिनिधिक फोटो)

Crime News: राजधानी दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोप मित्राने पीडितेला मारहाण करत छळही केला. क्रोर्याची परिसीमा गाठताना आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 28 वर्षीय आरोपीचं नाव पारस असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला आरोपीला बेड्या ठोकल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी पारससह गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होती. दक्षिण दिल्लीतील राजू पार्क परिसरात ते वास्तव्याला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीला पीसीआरला एक पती पत्नीला मारहाण करत असल्याचा फोन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीला एम्स रुग्णालयात घेऊन गेले. 

पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात नेलं असता तिच्या शरिरावर 20 जखमा होत्या. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीने आपण पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगची रहिवासी असल्याचं सांगितलं. फोनवरुन आपण आरोपीच्या संपर्कात आलो असं तिचं म्हणणं आहे," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

फोनवरुन बोलता बोलता पीडित तरुणीची आरोपी पारसशी मैत्री झाला होती. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून ते संपर्कात होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पीडित मुलगी बंगळुरुत पोहोचण्याची अपेक्षा होती. तिथे तिला मोलकरणीची नोकरी मिळाली होती असं अधिकाऱ्याने सांगितलं. 

तरुणीला बंगळुरुला जाताना दिल्लीहून प्रवास करायचा होता. यावेळी तिने मधे पारसची भेट घेण्याचं ठरवलं. भेट झाली असता पारसरने तिला तिथेच राहण्यास सांगितलं आणि आपण नोकरी शोधण्यात मदत करु असं आश्वासन दिलं. त्याने शब्द दिल्याने तरुणी त्याच्यासह राजू पार्क येथील भाड्याच्या घरात थांबली होती असंही अधिकाऱ्याने सांगितलं. 

पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले आरोपी पारस तरुणाला मारहाण करु लागला. यानंतर त्याने सलग आठवडाभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असं पोलिसांनी तिच्या जबाबाच्या आधारे सांगितलं आहे. एकदा तर आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली, ज्यामुळे ती भाजली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

तरुणीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी 30 जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 376 (बलात्कार) आणि 377 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि 2 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपी पारस हा उत्तराखंडचा असून, दिल्लीत आचारी म्हणून काम करतो असं पोलिसांनी सांगितलं आहे.