Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय

Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे. 

सायली पाटील | Updated: Apr 4, 2024, 11:04 AM IST
Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय title=
Japan earthquake scales Magnitude 6 1 off east coast of Honshu

Japan Earthquake : तैवानमध्ये (Taiwan Earthquake) आलेल्या 7.5 रिश्चर स्केलच्या भूकंपातून देश सावरत नाही, तोच जपानलाही भूकंपाचे हादरे बसले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जपानमध्ये गुरुवारी (4 एप्रिल 2024) धरणीकंप जाणवला. 6.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळं जपानमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. प्राथमिक माहितीनुसार जपानमधील होन्शू येथील पूर्व किनारपट्टीवर हा भूकंप आला. German Research Centre for Geosciences (GFZ)नं यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी हा भूकंप भूपृष्ठापासून साधारण 55 किमी खोल अंतरावर आल्याचं स्पष्ट झालं. तैवानमध्ये भूकंप आल्यानंतर जपानलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. इतकंच नव्हे, तर येथील समुद्रात उंच लाटा उसळण्याचा इशारा देत त्सुनामीसदृश्य परिस्थिती उदभवण्यासंदर्भातही भविष्यवाणी करण्यात आली होती. ज्यानंतर काही तासांतच जपानमध्ये हे संकट ओढावल्याचं पाहायलला मिळालं. 

सर्वाधिक सक्रीय टेक्टॉनिक प्लेटवर असणाऱ्या देशांपैकी एक असणाऱ्या जपानमध्ये इमारत बांधणीसाठी भूकंपाच्या दृष्टीनंच अभियांत्रिकी कौशल्याचा वापर केला जातो. ज्यामुळं जपानमध्ये 6 रिश्टर स्केलहूनही अधिक तीव्रतेचा भूकंप येऊन फारसं नुकसान झालं नाही. जवळपास 125 मिलियन इतकी लोकसंख्या असणाऱ्या जपानला दरवर्षी 1500 धरणीकंप जामवतात. यापैकी बहुतांश धक्के अतिशय सौम्य असून, अनेकदा त्यांची तीव्रता फक्त यंत्रांवरील आलेखामध्येच जाणवते. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान

भूकंपामुळं जपानमध्ये फारसं नुकसान झालं नसलं तरीही तैवानमधील नुकसान पाहता इथं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी तैवानमध्ये आलेल्या प्रचंड भूकंपामध्ये आतापर्यंत 9 जणांनी जीव गमावला, तर 1000 हून अधिक नागरिक जखमी असल्याचं वृत्त समोर आलं. तैवानमधील या भूकंपानंतर फिलिपिन्स आणि जपानला त्सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.