मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र

Elon Musk News : एलॉन मस्क यांच्या श्रीमंती आणि यशामागचं गुपित त्याच्या Ex Wife नं आणलं जगासमोर; तुम्हालाही त्याचा मंत्र फळेल

सायली पाटील | Updated: Sep 28, 2023, 01:00 PM IST
मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र title=
ex wife releaveld the secert behind elon musks wealth and success watch video

Elon Musk News : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी येणारं आणि बऱ्याच काळापासून अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील व्यावसायिकांसह प्रत्येत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि काळाच्या दोन पावलं पुढेच असणाऱ्या मस्क यांच्या संपत्तीचा आकडा कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारा. 

अशा या एलॉन मस्क यांच्याइतकं श्रीमंत व्हायचंय, असं अनेकजण म्हणतच असतील. त्या सर्वच मंडळींपुढे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंतीचं रहस्य अखेर जगासमोर आलं आहे. कॅनडियन लेखिका आणि एलॉन मस्क यांच्या पत्नी जस्टीन मस्क यांनी त्याबाबतचा खुलासा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

एलॉन मस्क आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या कमालीच्या यशाबाबत सांगताना जस्टीन म्हणाल्या, 'मी एका अशा व्यक्तीशी लग्न गेलं होतं जो पुढं जाऊन अतिशय यशस्वी व्यक्ती ठरला. तो मोठा होत असताना मी त्याला पाहिलं आणि दोन गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या. की त्या व्यक्तीनं प्रचंड मेहनत केली. इतकी की तुमच्या विचारांहूनही जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं अनेक गोष्टींना नकार दिला. 

त्याची वेळ ज्यांना हवी होती, त्यानं आपल्याकडे लक्ष द्यावं असं ज्यांना वाटत होतं त्या माणसांना त्यानं नकार दिला. त्याची उर्जा जिथं जिथं खर्च होणार होती तिथं तो नकार देत आला. त्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी काही गोष्टी नाकारल्या. जेणेकरून आवश्यक गोष्टी आवश्यक त्याच कामांसाठी वापरल्या जातील. 

मला त्यानंतर लक्षात आलं की त्याच्या प्रत्येक नकारामध्ये अंतर्मनाच्या तळाशी कुठंतरी होकार होता. त्याला जे हवं आहे त्या गोष्टींसाठी तो होकार होता. नकार ही एक अशी ठळक रेष होती जी एका शेवटासह एका सुरुवातीला अधोरेखित करत होती.'

तुम्हालाही होणार या यशाच्या मंत्राचा फायदा... 

एलॉन मस्क यांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टींचं पालन केलं त्या सर्व गोष्टी तुम्हीही आचरणात आणल्या तर, यशाच्या मार्गावर अनेक आव्हानं पेलण्याची ताकद तुम्हाला नक्कीच मिळेल. मुख्य म्हणजे एककेंद्री राहण्याची वृत्ती तुम्हाला ध्येयप्राप्तीच्या आणखी जवळ नेईल यात शंका नाही. त्यामुळं मस्क यांच्याकडून नकळत मिळालेला हा मंत्र एकदा आजमावून पाहाच.