फिश टँक की टीव्ही; LG ने लाँच केला जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट TV; थेट आरपार पाहता येणार

LG Transparent TV: लास वेगासमध्ये कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सुरु असून LG च्या टीव्हीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कंपनीने जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही पाहिल्यानंतर तुमच्याही भुवयाही आश्चर्याने उंचावतील.   

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2024, 02:01 PM IST
फिश टँक की टीव्ही; LG ने लाँच केला जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट TV; थेट आरपार पाहता येणार title=

लास वेगासमध्ये कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सुरु असून येथे एकापेक्षा एक दर्जेदार आणि नवे गॅजेट्स सादर केले जात आहेत. या शोमध्ये LG ने नवा टीव्ही LG Signature OLED T लाँच केला आहे. हा टीव्ही अतिशय वेगळा आणि अदभूत आहे. तसं पाहायला गेल्यास LG प्रत्येक वर्षी कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये टीव्ही लाँच करत असते. पण यावेळी लाँच करण्यात आलेला टीव्ही खास आहे. कारण हा पारंपारिक टीव्ही नाही, तर ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक टीव्ही आहे. 

सॅमसंगनेही आपला पारदर्शक डिस्प्ले सादर केला आहे. LG ने कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो 2024 मध्ये आपल्या M आणि G सीरिजला अपडेट करण्यासह पहिला पारदर्शक टीव्ही दाखवला आहे. हा टीव्ही 4K रेज्योलूशन आणि LG च्या वायरलेस ऑडिओ-व्हिडीओ तंत्रज्ञानासह येतो. 

या टीव्हीत खास काय आहे?

या युनिटमध्ये एक कॉन्ट्रास्ट स्क्रीन देण्यात आली आहे, जी एका बॉक्समध्ये रोलमध्ये येते. तुम्ही एका बटणासह तिला आत-बाहेर करु शकता. हा OLED TV कंपनीच्या अत्याधुनिक Alpha 11 AI प्रोसेसरसह येतो. जो मागील जनरेशनच्या तुलनेत 4 पट जास्त चांगला परफॉर्मन्स देतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, या अतिरिक्त पॉवरमुळे 70 टक्के अधिक चांगला ग्राफिक परफॉर्मन्स मिळतो. तर प्रोसेसिंग स्पीड 30 टक्के अधिक चांगला होतो. OLED T मॉडेल कंपनीच्या झिरो कनेक्ट बॉक्ससह येतो. जो मागील वर्षीच्या M3 OLED सह सादर झाला आहे. हा बॉक्स व्हिडीओ आणि ऑडिओला वायरलेस पद्धतीने टीव्हीपर्यंत पाठवतो. 

तुम्ही तुमचे सर्व स्ट्रिमिंग डिव्हाइस आणि गेम कंसोल या बॉक्सशी कनेक्ट करुन टीव्हीवर पाहू शकता. OLED T मॉडेलला खालच्या बाजूला स्पीकर देण्यात आले आहेत. यासह टीव्हीमध्ये बॅकलाइट्सही मिळतात. या टीव्हीत अनेक पर्याय मिळतील असा कंपनीचा दावा आहे. हा टीव्ही एखाद्या फिश टँकप्रमाणे भासतो. 

खरेदीसाठी कधी उपलब्ध होणार?

CES 2024 मध्ये सँसमंगनेही पारदर्शक डिस्प्ले सादर केला आहे. पण ते Micro LED व्हर्जन आहे. सॅमसंगने हा टीव्ही कधी लाँच करणार याबाबत काही माहिती दिलेली नाही. LG नेही आपल्या टीव्हीच्या किंमतीसंबंधी काही माहिती दिलेली नाही. पण हा OLED TV 2024 मध्ये विक्रीला आणण्याची योजना असल्याचं सांगितलं आहे.