कृष्णवर्णीय असल्याने मेडलच दिलं नाही, आर्त डोळ्याने 'ती' फक्त पाहत राहिली; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा आक्रोश

खेळाडूंना पदक घालून त्यांचा सन्मान केला जात असताना, एका कृष्णवर्णीय मुलीला दुर्लक्षित करण्यात आल्याचा धक्कादाक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर जिम्नॅस्टिक्स आयर्लंड वादाच्या भोवऱ्यात सापडलं.   

शिवराज यादव | Updated: Sep 26, 2023, 06:35 PM IST
कृष्णवर्णीय असल्याने मेडलच दिलं नाही, आर्त डोळ्याने 'ती' फक्त पाहत राहिली; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा आक्रोश  title=

आयर्लंडमध्ये एका जिम्नॅस्टिक खेळाडूला फक्त तिच्या रंगामुळे दुर्लक्षित करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खेळाडूंच्या गळ्यात पदक घालत त्यांचा सन्मान केला जात असताना कृष्णवर्णीय मुलीला जाणुनबुजून दुर्लक्षित करण्यात आलं. ही मुलगी वगळता इतर सर्व मुलींना मेडल घालण्यात आलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ गतवर्षी मार्च महिन्यातील आहे. व्हिडीओत सर्व मुली मेडल स्विकारण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचं दिसत आहे. पण मेडल देताना फक्त एकट्या कृष्णवर्गीय मुलीला वगळता सर्वांना मेडल दिलं जातं. मुलीलाही नेमकं काय झालं याची कल्पना नसल्याने ती मेडल मिळेल यासाठी आर्त नजरेने आयोजकांकडे पाहत होती. 

दरम्यान क्रीडा संघटनेने आपण हे प्रकरण गतवर्षीच आपापसात मिटवल्याचा दावा केला आहे. पण मुलीच्या आईने मात्र यावर अहसमती दर्शवली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, आपल्याकडे अद्यापही योग्य प्रकारे माफी मागितली नसल्याचं मुलीच्या आईने म्हटलं आहे. या घटनेनंतर आपलं कुटुंब फार नाराज होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. Irish Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचा रंग काळा असल्यानेच तिला दुर्लक्षित करण्यात आलं. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मेडल देणारी व्यक्ती मुलगी सोडून इतर सर्वांना मेडल देत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. 

या व्हायरल व्हिडीओवर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सही व्यक्त झाली असून, आपलं मन दुखावलं असल्याचं म्हटलं आहे. 'हा व्हिडीओ व्हायरल होत असताना, तिचे पालक माझ्यापर्यंत पोहोचले होते. हा व्हिडीओ पाहून माझं मन दुखावलं होतं. यानंतर मी तिला एक व्हिडीओ पाठवला होता,' अशी माहिती तिने एक्सवर दिली आहे. कोणत्याही खेळात वर्णद्वेषाला जागा नाही असंही तिने लिहिलं आहे. 

Irish Independent ने मुलीच्या आईशी संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली की, सिमोनने मुलीला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मला तुला सांगायचं आहे की, अलीकडेच तुमच्या जिमस्टार्ट कार्यक्रमात तुला कशी वागणूक मिळाली हे मी पाहिलं. मला फार धक्का बसला होता आणि तुला हे सांगायचे होते की इतर मुलींप्रमाणेच तूदेखील पदकास पात्र आहेस”. 

"मला माहित आहे की तू या खेळासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मी तुझ्या पाठीशी आहे," असं ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याने मुलीला सांगितलं. 

जिम्नॅस्टिक आयर्लंडने मागितली माफी

व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानंतर जिम्नॅस्टिक्स आयर्लंडने आक्रोश पाहता अखेर या घटनेबद्दल माफी मागितली आहे. "जिम्नॅस्टिक्स आयर्लंडच्या बोर्ड आणि कर्मचार्‍यांच्या वतीने आम्ही जिम्नॅस्ट आणि तिच्या कुटुंबियांची मार्च 2022 मध्ये जिमस्टार्ट इव्हेंटमध्ये झालेल्या घटनेबद्दल माफी मागू इच्छितो," असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. "त्या दिवशी जे घडले ते घडायला नको होते आणि त्याबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे," असंही ते म्हणाले आहेत. 

मुवही अजूनही कार्यक्रमात सहभागी होत आहे हे पाहून आम्ही आनंदित आहोत. शेवटी, आम्ही हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छितो की जिम्नॅस्टिक्स आयर्लंड कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषाचा निषेध करते असंही ते म्हणाले आहेत.