T20 WC Squad : ऋषभ मानलं रे भावा...! 16 महिन्यांचा वनवास संपवून टीम इंडियामध्ये शानदार एन्ट्री

Rishabh Pant In T20 WC Squad : दुखापतीने खचला नाही, परिस्थितीशी नडला अन् पुन्हा ऋषभ पंतने टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. मात्र, गेल्या 16 महिन्यांचा प्रवास ऋषभसाठी साधासुधा नव्हता.

सौरभ तळेकर | Updated: Apr 30, 2024, 05:08 PM IST
T20 WC Squad : ऋषभ मानलं रे भावा...! 16 महिन्यांचा वनवास संपवून टीम इंडियामध्ये शानदार एन्ट्री title=
Rishabh Pant In Team indias T20 World Cup Squad

Team India for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून (BCCI) आता टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत 15 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर 4 खेळाडूंना राखीव म्हणून ठेवण्यात आलंय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे, तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्या कायम राहिल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केएल राहुल याला संघात स्थान मिळालं नाही. तर टीम इंडियामध्ये तब्बल 16 महिन्यानंतर ऋषभ पंतचं कमबॅक (Rishabh Pant In T20 WC Squad) झालंय. अपघातानंतर ऋषभने ज्याप्रकारे पुनरागमन केलंय, हे पाहून अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतूक केलंय.

30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून डेहराडूनला जात असताना ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर गुडघा 180 अंशात वळला अन् ऋषभच्या स्वप्नांचा चुराडाच झाला. पुन्हा क्रिकेट खेळणं काय... तर उभं देखील राहता येईल का? अशी भीती त्याला वाटत होती. पण ऋषभ थांबला नाही. उपचार घेतले अन् पुन्हा क्रिकेट खेळायचं ठरवलं. परदेशात जाऊन उपचार घेतले. त्यात मानसिक त्रास सुरू झाला. पण त्याला पुन्हा  मैदानात खेळायचं होतं. एनसीएमध्ये ऋषभ दररोज मेहनत घेत होता. कधी काठीचा आधार घेऊन चालणारा ऋषभ पुन्हा धावायला लागला. हातात बॅट घेतली अन् आता ऋषभ आयपीएल गाजवतोय. 

ऋषभ पुन्हा मैदानात आला खरा पण त्याला पूर्वीची ती फलंदाजी जमेल का? अशी भीती प्रशिक्षकांना होती. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनेंट असं म्हणतात. ऋषभची लढण्याची तयारी त्याला प्रेरणा देत होती. तो पुन्हा आयपीएलमध्ये आला अन् दिल्लीचं नेतृत्व केलं. संघाची जबाबदारी आणि स्वत:च्या फलंदाजीचं प्रदर्शनाचं झोप ऋषभच्या खांद्यावर होतं. या सर्व गोष्टींना ओझं न समजता ऋषभने जबाबदारी आनंदाने मिरवली. सुरूवातीला वाईट परिस्थिती असणाऱ्या दिल्लीला ऋषभने पुन्हा बळ मिळवून दिलं. आता ऋषभ पुन्हा टीम इंडियामध्ये आलाय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऋषभची एन्ट्री झालीये. त्यामुळे ऋषभचा संघर्ष पाहून नक्की म्हणावं वाटेल... ऋषभ मानलं रे भावा...! 

T-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.