Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माच्या पर्सनल व्हिडीओ आरोपांवर चॅनेलने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले 'आमच्याकडे...'

Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रोहित शर्माने आयपीएलचा (IPL) ब्रॉडकास्टर चॅनेल स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) पर्सनल व्हिडीओ चालवल्याचा आरोप केला. आता यानंतर चॅनेलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 06:15 PM IST
Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माच्या पर्सनल व्हिडीओ आरोपांवर चॅनेलने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले 'आमच्याकडे...' title=

Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता आयपीएलमध्ये खेळत नसल्याने विश्रांती घेत आहे. मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकला नाही. दरम्यान रोहित शर्माने आता आपलं लक्ष टी-20 वर्ल्डकपकडे वळवलं आहे. पण यादरम्यान रोहित शर्माच्या एका पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रोहित शर्माने आयपीएलचा (IPL) ब्रॉडकास्टर चॅनेल स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) पर्सनल व्हिडीओ चालवल्याचा आरोप केला. आता यानंतर चॅनेलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. चॅनेलने रोहित शर्माचे आरोप फेटाळले आहेत. 

रोहित शर्माने आपल्या पोस्टमधून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमधून त्याने स्टार स्पोर्ट्सला खडेबोल सुनावले आहेत. आपण नकार दिल्यानंतरही चॅनेलने पर्सनल व्हिडीओ चालवल्याबद्दल रोहित शर्माने जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खेळाडूंचंही वैयक्तिक आयुष्य असतं. ते मित्रांशी गप्पा मारतात, फिरतात, कुटुंबासह असतात. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करणं योग्य नाही असं रोहितने म्हटलं आहे. 

रोहित शर्माने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

रोहित शर्माने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "क्रिकेटर्सच्या आयुष्यात फार दखल दिली जात आहे. कॅमेरा आमचं प्रत्येक पाऊल आणि संभाषण रेकॉर्ड करत आहे जे आम्ही आमचे मित्र, सहकारी यांच्याशी प्रशिक्षणादरम्यान आणि सामन्याच्या दिवशी करतो". पुढे त्याने लिहिलं आहे की, "मी स्टार स्पोर्ट्सला संभाषण रेकॉर्ड करु नका असं सांगितलं असतानाही त्यांनी केलं आणि ऑन एअरही केलं. हे गोपनीयतेचं उल्लंघन आहे. एक्स्क्लुझिव्ह कंटेंट मिळवण्याची गरज आणि व्ह्यूज, एंगेजमेंट यावर लक्ष्य केंद्रीत केल्याने एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल".

स्टार स्पोर्ट्सकडून स्पष्टीकरण

याप्रकरणी ब्रॉडकास्टार चॅनेलने स्पष्टीकरण दिलं असून सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, "ही क्लिप 16 मे रोजी वानखेडे स्टेडिअममध्ये एका प्रॅक्टिस सेशनदरम्यान रेकॉर्ड करण्यात आली होती. याचे अधिकृत हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. यामध्ये एक वरिष्ठ खेळाडू आपल्या मित्रांसह बाजूला उभे राहून बोलताना दिसत आहे".

तसंच पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "या संभाषणाचा ऑडिओ किंवा व्हिडीओ काहीही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. ज्या क्लिपमध्ये वरिष्ठ खेळाडूने ऑडिओ रेकॉर्ड न करण्याची विनंती केली आहे तो व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सच्या प्री-मॅचच्या तयारीदरम्यान लाईव्ह कव्हरेजमध्ये दाखवण्यात आलं होतं. ज्याची एडिटोरियलला कल्पना नव्हती". 

ब्रॉडकास्टरने सांगितलं आहे की, 'स्टार स्पोर्ट्सने क्रिकेटचं प्रसारण करताना व्यावसायिक आचरणाच्या सर्वोच्च मानकांचं पालन केले आहे. खेळाडूंच्या गोपनीयतेची काळजी घेतली जाते आणि त्यांचा आदर केला जातो".

कोणत्या व्हिडीओवरुन रोहित शर्मा नाराज?

आयपीएल दरम्यान रोहितचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे रोहित शर्मा संतापलेला दिसत आहे. असाच एक व्हिडिओ ब्रॉडकास्टर चॅनलने चालवला होता, ज्यामध्ये रोहित मुंबई संघाचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी आणि इतरांसोबत बोलत होता. त्यानंतर रोहितने कॅमेरामनला रेकॉर्डिंग न करण्यास सांगितले होतं. पण तरी हा व्हिडिओ चॅनलवर चालला होता.

व्हिडिओमध्ये रोहित 'भाई, ऑडिओ बंद करा, एका ऑडिओने माझी वाट लावली आहे.' असं सांगताना ऐकू येत आहेत. कदाचित रोहित त्या व्हिडिओबद्दल बोलत असेल ज्यामध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत होता. हा व्हिडिओ चॅनलवर चालला आणि चांगलाच व्हायरल झाला. यानंतर चाहत्यांनी रोहित आता पुढच्या सत्रात कोलकाता संघात सामील होऊ शकतो, असा अंदाज लावला.