भरधाव ट्रकने बाईकला उडवलं... आई वडिलांसह मुलीचा दुर्देवी मृत्यू

Nagpur News : नागपुरात घडलेल्या या हदृयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले होते

आकाश नेटके | Updated: Apr 29, 2023, 02:55 PM IST
भरधाव ट्रकने बाईकला उडवलं... आई वडिलांसह मुलीचा दुर्देवी मृत्यू title=

Nagpur News : नागपूरमध्ये (Nagpur News) गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या (Road Accident) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक जवळील आमडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघांना भरधाव ट्रकने उडवल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आई,वडील आणि मुलीचा जागीच मृत्यु झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

नागपूरमधील रामटेक जवळील आमडी फाट्यावरुन बाईकने जात असताना या कुटुंबासोबत हा जीवघेणा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच बाईकवरुन हे कुटुंबिय जात होते. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात आई, वडिलांसाह मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे या भीषण अपघातानंतर महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने अनेक वर्षांपासून अंडरब्रिजची मागणी होत आहे. मात्र अपघातांनंतरी अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आणखी किती लोकांचा बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात

दरम्यान, आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांच्या वाहनाला वर्ध्यानजीक समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हरियाणा पोलिसांच्या वाहनाने ट्रकला जोरदार धडत दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.

परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलिस समृद्धी महामार्गाने जात होते. दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण ह्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.