रामटेक मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

 रामटेकमध्ये काँग्रेसमधली गटबाजी उफाळून आलीय. किशोर गजभीये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नितीन राऊतांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Mar 26, 2019, 05:48 PM IST
रामटेक मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली  title=

नागपूर : जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये काँग्रेसमधली गटबाजी उफाळून आलीय. किशोर गजभीये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नितीन राऊतांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. गटातटाच्या राजकारणामुळे काँग्रेस उमेदवाराचा कसा निभाव लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर जिल्ह्यातलं रामटेक जिंकण्यासाठी निघालेल्या काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसमधील गटबाजीचा जाहीर तमाशा पाहायला मिळाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेसच्या किशोर गजभीये यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर दोन तासांनी माजी मंत्री नितीन राऊत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

हायकमांडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे नितीन राऊत सांगत होते. पण काही वेळात ते अर्ज न भरता निवडणूक कार्यालयातून बाहेर पडले. काँग्रेसचा बी फॉर्म नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळानं भाजपा-शिवसेनेच्या हातात आयतंच कोलीत मिळाले आहे. गजभीयेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही नितीन राऊतांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केलेली धडपड कार्यकर्त्यांना कोड्यात टाकणारी आहे. नेत्यांमधली टोकाची गटबाजी समोर आली असताना कार्यकर्ते एकदिलाने कसे काम करतील असा प्रश्न आता विचारला जात आहे. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसचा शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंसमोर कसा निभाव लागणार असा प्रश्न निर्माण झाला.