जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकावर गोळीबार करण्यात आला आहे. गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 11, 2023, 04:27 PM IST
जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या title=

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शहातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयात माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

प्राथमिक माहितीनुसार मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गजानन तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या.

चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या गजानन तौर यांना लागल्या, तर एक गोळी चाटून गेली. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी तसंच खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांचा मोठा जमाव झाला होता. यानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
तौर यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.