सोन्याची बिस्किटं, दोन फ्लॅट अन् 72 लाखांचे दागिने; जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यातील लाचखोर पोलिसाकडे कोट्यावधींचं घबाड

 यानंतर त्यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपये रोख, सोन्याची बिस्किट आणि 72 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

Updated: May 17, 2024, 01:37 PM IST
सोन्याची बिस्किटं, दोन फ्लॅट अन् 72 लाखांचे दागिने; जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यातील लाचखोर पोलिसाकडे कोट्यावधींचं घबाड title=

Beed Jijau Multistate Bank Scam : बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात एका व्यापाऱ्यास आरोपी न करण्यासाठी एक कोटीच्या लाचेची मागणी करणाऱ्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे. हरिभाऊ खाडे असे घरावर धाड पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या घरावर पडलेल्या धाडीत कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. सध्या तो फरार आहे.

जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये मोठा घोटाळा

बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोडी अंती 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. 

सोन्याची बिस्किट, 72 लाख रुपयांचे दागिने जप्त

त्यानुसार पाच लाखाचा पहिला हप्ता घेताना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली. तर हरिभाऊ खाडे व जाधव हे फरार आहेत. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार, हरिभाऊ खाडे यांच्या बीडमधील चाणक्यपुरी भागातील घराची झडती घेण्यात आली. यानंतर त्यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपये रोख, सोन्याची बिस्किट आणि 72 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

सर्व मुद्देमाल जप्त

त्यासोबतच चार लाख 62 रुपयांची 5.5 किलो चांदी, बारामतीसह परळीतील फ्लॅट, इंदापूर येथे फ्लॅट आणि व्यापारी गाळा अशी स्थावर मालमत्ता देखील आढळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या सहकारी करत आहेत.