एका कोंबड्याने घेतला तिघांचा जीव, दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचाही मृत्यू

मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब बराच वेळ काही हालचाल करत नसल्याने अमित सेन विहिरीत उतरला होता. पण नंतर तोदेखील काही हालचाल करत असल्याचं लक्षात आल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 04:32 PM IST
एका कोंबड्याने घेतला तिघांचा जीव, दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचाही मृत्यू title=

आसाममध्ये एका कोंबड्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. झालं असं कोंबड्याला वाचवण्यासाठी छोट्या भावाने विहिरीत उडी मारली. पण बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने मोठ्या भावानेही उडी मारली. पण तोदेखील बाहेर येत नसल्याचं पाहिल्यानंतर एका स्थानिक मुलाने विहिरीत उडी घेतली. पण जेव्हा तोदेखील हालचाल करत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा मात्र कुटुंबाला काहीतरी गडबड असल्याचं समजलं आणि त्यांनी थेट पोलिसांना फोन करुन माहिती दिली. 

आसामच्या कछार जिल्ह्यातील लखीमपूर येथे ही घटना घडली आहे. येथील एक कुटुंबाचा पाळीव कोंबडा विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील दोन भावांनी प्रयत्न सुरु केले. मनजीत देब आणि प्रोसनजीत देब हे दोन्ही भाऊ विहिरीत उतरले होते, जेणेकरुन कोंबड्याला सुरक्षित बाहेर आणलं जावं. पण जेव्हा दोन्ही भाऊ काही हालचाल करत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा एका स्थानिक मुलाने विहिरीत उडी मारली. पण जेव्हा तोदेखील बाहेर येत नसल्याचं दिसलं तेव्हा कुटुंबाला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. 

यानंतर पोलीस आणि प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर स्थानिक पोलिसांनी एसडीआरएफला बोलावलं. बचावकार्यादरम्यान ऑपरेशन टीमने विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीतील विषारी गॅसमुळे गुदमरुन तिघांचा मृत्यू झाला. 

पोलीस महानिरीक्षक नुमल महत्ता यांनी सांगितलं आहे की, "ही घटना फारच दुर्भाग्यपूर्ण आहे. विहिरीत एक व्यक्ती पडला होता. त्याला वाचवण्यासाठी दोघेजण विहिरीत उतरले होते. यानंतर या तिघांचाही पत्ता लागत नव्हता. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस-प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत".

Tags: