5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या

Narayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 21, 2024, 01:14 PM IST
5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या title=
कंपनीने जाहीर केला निर्णय

Narayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा 5 महिन्याच्या नातवाची संपत्ती रातोरात 4.2 कोटी रुपयांनी वाढली आहे. एकाग्र रोहन मूर्ती असं या कोट्यधीश झालेल्या चुमकल्याचं नाव असून काही महिन्यांपूर्वी आजोबांनी दिलेल्या अनोख्या भेटीचा परतावा एकाग्रला अवघ्या 4 महिन्यांमध्ये मिळा आहे. नारायण मूर्ती यांनी मार्च महिन्यात त्यांच्या नावे असलेले कोट्यवधींचे शेअर्स हे नातू एकाग्रच्या नावे केले केले होते. याच शेअर्सवर आता कंपनीने वर्षातील फायनल डिव्हिडंट म्हणजेच गुंतवणुकीवरील परतावा जाहीर केला असून स्पेशल डिव्हिडंटही जाहीर केला आहे.

एक नाही दोन दोन गुड न्यूज

इन्फोसिसच्या शेअर होल्डर्सला कंपनीने एक नाही तर दोन गुड न्यूज दिल्यात. इन्फोसिसने चौथ्या तिहामहीतील नफ्याची आकडेवारी जाहीर करताना, कंपनीच्या बोर्डाने अंतिम डिव्हिडंट म्हणून प्रती इक्विटी 20 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2024 रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षासाठी हा डिव्हिडंट दिला जाणार असून त्याचबरोबर 8 रुपये प्रती इक्विटीचा विशेष डिव्हिडंटही दिला जाणार आहे.

1 जूनला मिळणार पैसे

1 जून 2024 रोजी हे दोन्ही डिव्हिडंट भागिदारांच्या खात्यात जमा होतील, असं कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे. मागील महिन्यामध्ये नारायण मूर्तींनी एकाग्र रोहन मुर्ती याच्या नावावर 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट म्हणून ट्रान्सफर केले होते. त्यामुळे एकाग्रच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. म्हणजेच कंपनीचा 0.04 टक्के वाचा या 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या नावावर आहे. एका शेअरवर 28 रुपये अशा हिशोबाने डिव्हिडंटचा विचार केला तर एकाग्रहला कंपनीच्या नव्या निर्णयामुळे 1 जून रोजी 4.20 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एकाग्र 10 जून 2024 रोजी सात महिन्याचा होण्याआधीच 244 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचा मालक असेल.

कोण आहे एकाग्र मूर्ती?

नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुत्ररत्नप्राप्ती झाली. 10 नोव्हेंबर रोजी नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती आजी-आजोबा झाले. बंगळुरुमध्येच एकाग्रचा जन्म झाला. नारायण मूर्तींना रोहन आणि अक्षता अशी दोन मुलं आहेत. नारायण मूर्तींची मुलगी अक्षता मूर्ती ही सध्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. अक्षता यांचेही इन्फोसिसमध्ये शेअर्स आहेत. त्यांनाही दोन मुली आहेत.

नारायण मूर्तींच्या वाट्यात घट

नारायण मूर्तींनी आपल्या नावावरील शेअर्स नातवाच्या नावावर वळवल्याने त्यांची कंपनीतील भागिदारी आता अवघ्या 0.36 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ही महिती इन्फोसिस कंपनीनेच दिली आहे. नारायण मूर्तींच्या या निर्णयामुळे चार महिन्यांचा चिमुकला २४० कोटींचा मालक झाला आहे.