राज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.

रामराजे शिंदे | Updated: Mar 19, 2024, 07:13 PM IST
राज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार? title=

Loksabha 2024 :  राजधानी दिल्लीत ग्रेट भेट झाली. अमित शाहांच्या (Amit Shah) दिल्ली दरबारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) हजेरी लावली. तब्बल 30 मिनिटांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. लोकसभेला महाराष्ट्रातून 45 पारचं लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्रात नवा डाव, नवा राज मांडण्याची रणनीती भाजपनं (BJP) आखल्याचं समजतंय. त्यासाठी भाजप श्रेष्ठींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बोलावणं धाडलं. उद्धव ठाकरे आणि भाजपची युती तुटल्यानंतर आता नवा ठाकरे महायुतीत (Mahahyuti) सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

महायुतीत नवा 'ठाकरे'?
राज ठाकरे महायुतीत आल्यास महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो. राज ठाकरेंच्या रुपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात, त्यामुळंच राज ठाकरेंना महायुतीत सामावून घेतलं जाणार असल्याचं समजतंय. दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा म्हणून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी, असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय.. तर शिर्डीमधून मनसे नेते बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे

उद्धव ठाकरे यांची टीका
राज ठाकरेंना एनडीएमध्ये सामील करून घेण्याच्या हालचालींमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा महाराष्ट्रात सुरू झालीय. आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा तिखट हल्ला उद्धव ठाकरेंनी चढवला. महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचा हल्लाबोल
 छट पुजेला विरोधी करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या तसंच नेहमी उत्तर भारतीयांचा द्वेष करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे, हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे, त्यांच्याशी गद्दारी आहे असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. 

मनसेची एकला चालो रे भूमिका?

मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत एकला चालो रे अशीच भूमिका आतापर्यंत राज ठाकरेंनी घेतली. मात्र राजकारणातले बदलते वारे लक्षात घेऊन मनसेही युतीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी नेहमीच ऊठबस असते. गेल्या वर्षभरापासूनच राज ठाकरेंनी हिंदू जननायक अशी स्वतःची वेगळी इमेज उभी केली. त्यामुळं हिंदुत्वाच्या व्यापक भूमिकेवर मनसे भाजपसोबत गेल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.