काँग्रेस पक्षाची कोट्यवधी रुपये असणारी बँक खाती गोठवली, 210 कोटींची मागणी! आरोपानंतर लगेच दिलासा

काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी यांनी काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. खाती गोठवण्यात आल्याने ना पगार देणं शक्य होत आहे, ना बिलं भरणं शक्य होत आहे असं ते म्हणाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Feb 16, 2024, 01:37 PM IST
काँग्रेस पक्षाची कोट्यवधी रुपये असणारी बँक खाती गोठवली, 210 कोटींची मागणी! आरोपानंतर लगेच दिलासा title=

काँग्रेसने आपली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार असतानाच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धक्का असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच खाती गोठवण्यात आल्याने पगार देणं, बिलं भरणं शक्य होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या आरोपानंतर काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला. इनकम टॅक्स ट्रिब्युनलने पक्षाची मागणी ऐकून तत्काळ खात्यांवरील बंदी हटवली. यासंदर्भात बुधवारी सुनावणी होणार असून सविस्तर आदेश दिले जातील अशी माहिती पक्षाचे नेते विवेक तन्खा यांनी दिली आहे.

तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन हा मुद्दा लावून धरला. "काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. आपल्या देशात लॉकडाउन लागला आहे. आपल्या देशाची लोकशाही गोठवली आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यासाठी काही आठवडे शिल्लक असताना सरकार ही कारवाई करत नेमकं काय सिद्ध करु पाहत आहे. देसाच्या प्रमुख पक्षाची खाती गोठवली आहेत. आयकर विभागाने 210 कोटींची रिकव्हरी मागितली आहे," असं अजय माकन यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, "2018-19 च्या इन्कम टॅक्स फायलिंगच्या आधारे करोडो रुपये मागितले जात आहेत. ही फार लाजिरवाणी बाब आहे. लोकशाहीची हत्या केली जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी आमची खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्ष सदस्यत्व मोहिमेच्या आधारे युथ काँग्रेसकडून जे पैसे जमा करतो, तेदेखील गोठवण्यात आले आहेत".

आयकर विभागाने केलेल्या कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाने कायदेशीर पाऊल उचललं असून सध्या हे प्रकरण आयकर न्यायाधिकरणासमोर आहे. पत्रकार परिषदेत माकन यांनी सुनावणी प्रलंबित असल्याने त्यांनी आधी माहिती उघड न करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती दिली. 

काँग्रेस पक्षाला गुरुवारी खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती मिळाली. पक्षाचे वकील विवेक तानखा यांनी एकूण चार खात्यांना फटका बसला असल्याचं सांगितलं. बँकांना काँग्रेसच्या नावे असणारे चेक स्विकारु नये असा आदेश देण्यात आला आहे. अजय माकन यांनी सांगितलं आहे की, "पक्षाला आयकर परतावा दाखल करण्यासाठी उशीर झाला होता. पण 45 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. याचा अर्थ खाती गोठवली जाणं होत नाही. आम्हाला याचा फटका बसला असून वीजेचं बिल भरण्यासाठी, पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. आम्ही ना बँकेत पैस जमा करु शकत आहोत, ना काढू शकत आहोत".