'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 20, 2024, 10:49 AM IST
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम title=
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) खासदार स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी पोलिसांकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे सहकारी बिभव कुमार (Bibhav Kumar) यांच्याविरोधात तक्रा दाखल केली आहे. मलिवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. यामध्ये मलिवाल यांनी, मुख्यमंत्र्यांच्या घरात बिभव कुमार यांच्याकडून 'मला अत्यंत क्रूरपणे वागणूक देण्यात आली' तसेच 'जाणीवपूर्वकपणे माझं शर्ट खेचण्यात आलं,' असं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. "माझ्या शर्टाची बटणं उघडण्यात आली आणि शर्ट वर उडवण्यात आला," असं मलिवाल यांनी तक्रारीत म्हटल्याचं वृत्त 'टाइम्स नाऊ'ने तक्रारीच्या प्रतीच्या आधारे दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय घडलं हे सांगितलं

पोलिसांनी या प्रकरणामध्ये आयपीसी 308, 342, 354(B), 506, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या एका तुकडीने 16 मे रोजी मलिवाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या तुकडीने चार तास मलिवाल यांची त्यांच्या घरीच चौकशी केली. या चौकशीदरम्यान मलिवाल यांनी केजरीवाल यांच्या सिव्हील लाइन्सच्या घरात नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील सविस्तर तपशील दिली. 

मी ओरडून सांगत होते माझे पिरिएड्स सुरु आहेत

"बिभव कुमारने माझ्या छातीत लाथ मारली. त्याने माझ्या पोटात आणि ओटीपोटावर लाथा मारल्या. मला फार त्रास होत होता. मी त्याला थांबायला सांगत होते. माझ्या शर्टाचं इन निघालं आणि ते अस्ताव्यवस्त झालं मी त्याला थांबायला सांगतो होते मात्र तो लाथा मारत राहिला. मी त्याला वारंवार माझे पिरिएड्स (मासिक पाळी) सुरु आहेत, असं ओरडून सांगत होते. मला जाऊ द्या, मला फार वेदना होत आहेत हे मी त्याला सांगितलं. मात्र तो पूर्ण ताकदीने मला वारंवार मारत होता. मी कशी तरी तिथून बाहेर पडले," असं मलिवाल यांनी पोलिसांना सांगितलं. त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेला एकही कार्यकर्ता माझ्या मदतीला पुढे आला नाही असंही मलिवाल म्हणाल्या.

'अशा जागी गाडेन की...'

"मला मारहाण झाल्यानंतर मी ड्रॉइंग रुममधील सोफ्यावर बसून होते. मी जमीनीवर पडलेला माझा चष्मा उचलला, असंही मलिवाल म्हणाल्या. "मला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. मी 112 क्रमांकावर फोन लावला आणि माझ्याबरोबर जे घडलं त्याची तक्रार नोंदवली," असं मलिवाल यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मारहाण केल्यानंतर बिभव कुमारने आपल्याला धमकावल्याचा दावाही मलिवाल यांनी केला आहे. "तुला जे करायचं आहे ते कर. तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही. तुझी हाडं अन् हाडं एक करेन. अशा जागीन गाडेन की कोणाला कळणार नाही," अशा शब्दांमध्ये बिभवने मला धमकावल्याचं मलिवाल म्हणाल्या आङेत. 

मी पोलिसांना फोन केल्याचं समजल्यानंतर...

"त्यानंतर मी 112 वर फोन केल्याचं त्याच्या लक्षाच आलं. तो रुमबाहेर गेला आणि सुरक्षारक्षकांबरोबर आला आला. मी त्यांना सांगत होते की मला क्रूरपणे मारहाण झाली आहे. पोलिसांची पीसीआर व्हॅन येईपर्यंत तुम्ही माझी काळजी घ्या, असं मीत्यांना सांगितलं. मात्र त्यांनी मला निघून जाण्यास सांगितलं. मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर नेण्यात आलं. मी त्यांच्या घाराबाहेर बराच वेळ एकटीच बसून होते कारण मला फार दुखत होतं," असं मलिवाल यांनी सांगितलं. "मी पूर्णपणे शुद्ध हरपल्यासारखी होते. मी माझ्या आधीच्या सिव्हील लाइन्सच्या घराकडे चालू लागले," असंही मलिवाल म्हणाल्या.

मी रडत होते...

"मी रडत होते आणि कशीतरी माझ्या घरी पोहोचले. मी जमीनीवर बसून होते. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावरुन माझ्यासोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्यासाठी ऑटो बोलावली," असंही मलिवाल यांनी सांगितलं.