'अमिताभ बच्चन यांनी मला उचललं अन्...'; अभिनेत्री मधुने पहिल्यांदाच केला खुलासा

'रोजा' चित्रपटातील अभिनेत्री मधुने बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नेतृत्वात खेळलेल्या क्रिकेट सामन्यामधील एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. हा सामना सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यात खेळला गेला होता   

शिवराज यादव | Updated: May 16, 2024, 08:10 PM IST
'अमिताभ बच्चन यांनी मला उचललं अन्...'; अभिनेत्री मधुने पहिल्यांदाच केला खुलासा title=

अमिताभ बच्चन यांनी चॅरिटी सामन्यातील विजयानंतर मला खांद्यावर घेऊन विजयी फेरी काढली होती असा किस्सा 'रोजा' चित्रपटातील अभिनेत्री मधुने सांगितला आहे. Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत तिने जुन्या दिवसांच्या आठवणी जागा करताना हा किस्सा सांगितला. हा सामना सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यात खेळला गेला होता. अमिताभ बच्चन सेलिब्रिटी संघाचे कर्णधार होते आणि मधू त्यांच्या संघात होती. 

मुलाखतीदरम्यान या सामन्यातील आठवणी जाग्या करताना मधूने सांगितलं की, "मी बच्चन साहेबांच्या संघात होते. ते आमचे कर्णधार होते आणि मी खेळाडूंपैकी एक होते. ते मैदान हैदराबादमध्ये होतं. मैदानात लोकांची फार गर्दी होती. 5 हजार की 50 हजार लोक होते. नुसता टाळ्यांचा कडकडाट सुरु होता".

मधूने फलंदाजी करताना दोन धावा केल्या, तसंच शेवटची विकेटही घेतली ज्यामुळे संघाचा विजय सुनिश्चित झाला. तो क्षण आठवताना मधूने सांगितलं की, "हजारो लोक त्यावेळी एकाच वेळी टाळ्या वाजवत होते. मी त्या टाळ्या ऐकतच होते. मला कलाकार म्हणून इतक्या टाळ्या ऐकल्या नव्हत्या. पण ते जाणवत होतं". अमिताभ यांनी विजय कशाप्रकारे साजरा केला? असं विचारण्यात आलं असता मधूने सांगितलं की, 'त्यांनी मला उचललं आणि मैदानात विजयी फेरी मारली'.

याआधी झूमला दिलेल्या मुलाखतीत मधूने हेमा मालिनीसोबतच्या नातेसंबंधामुळे चित्रपटसृष्टीत कशाप्रकारे आदर मिळाला याबद्दल सांगितलं. मधु हेमा मालिनी यांची चुलत बहीण आहे आणि जुही चावलाने तिच्या (मधूच्या) पतीच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे. जुही चावलापेक्षा हेमा मालिनी यांचा मधुच्या आयुष्यावर आणि व्यावसायिक निवडीवर प्रभाव आहे.

मधूने झूमला सांगितलं की, "मी हेमाजींची चुलत बहीण आहे आणि जुहीने माझ्या पतीच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे. आमचं कलाकारांचं कुटुंब आहे. पण, जुही माझ्या आयुष्यात खूप नंतर कुटुंबातील सदस्य म्हणून आली. मी लग्न केल्यानंतर आणि जवळपास इंडस्ट्री सोडल्यानंतर आम्ही नात्यात आलो, त्यामुळे तिच्या कुटुंबात राहण्याचा किंवा मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या माझ्यावर परिणाम झाला नाही. पण हेमाजींच्या कुटुंबातील असल्याने मला फक्त चांगला परिणामच जाणवला. हेमाजींच्या उंचीच्या कलाकाराच्या घरातून आल्याने मला खूप प्रतिष्ठा मिळाली."

मधु 'ईगल' चित्रपटात अखेरची दिसली होती. कार्तिक गट्टमनेन दिग्दर्शित या तेलुगू चित्रपटात नवदीप, विनय राय, अनुपमा परमेश्वरन आणि काव्या थापर यांच्यासोबत रवी तेजा मुख्य भूमिकेत होते.