रूपेरी पडद्यावरील हेमा मालिनींचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिकेचे वयाच्या 86 वर्षी निधन

Singer Sharda Death: संगीताचा मोठा वारसा असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक नामवंत कलाकार आणि गायक निखळू लागले आहेत. त्यातील एक नाव शारदा यांचे, आज प्रदीर्घ आजारानं त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनावर सगळ्यांनीच शोक व्यक्त केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 14, 2023, 08:56 PM IST
रूपेरी पडद्यावरील हेमा मालिनींचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिकेचे वयाच्या 86 वर्षी निधन  title=
फाईल फोटो

Singer Sharda Death: हिंदी सिनेसृष्टीला संगीताचा मोठा वारसा आहे. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या मोठ्या संगीतकारांनी आणि गायकांना हिंदी चित्रपटसृष्टीला खुलवून टाकलं आहे. परंतु सध्या आलेल्या एका बातमीनं मात्र हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायिका शारदा यांचे आज वयाच्या 86 वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं हिंदी संगीतक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या एका गंभीर आजारानं ग्रस्त होत्या. शेवटी त्यांची मृत्यूशी असलेली झुंज संपली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. 

'तितली उडी' या गाण्यानं त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 1966 साली 'सूरज' या चित्रपटासाठी त्यांनी हे गाणं गायलं होतं. शारदा यांचे संपुर्ण नावं हे शारदा अयंगार असे होते. त्यांचा जन्म तामिळ परिवारात झाला होता. त्यांना 'तितली उडी' या गाण्यासाठी पुरस्कारही मिळाला होता. खासकरून हेमा मालिनीच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी आवाज दिला होता. यासह त्यांनी अनेक चित्रपटांच्या गाण्यांसाठी पार्श्वगायन केले आहे. 'अराऊंड द वर्ल्ड', 'गुमनाम', 'सपनों का सौदागर', 'कल आज और कल', 'एन इवनिंग इन पॅरिस' अशा लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी गायली आहे.

'कांच की दिवार' या चित्रपटातून त्यांनी शेवटचे गाणं गायले होते. त्यानंतर 2007 साली एका अल्बमसाठी त्यांनी गाणं गायले होते. शारदा या सोशल मीडियावरही एक्टिव्ह होत्या, त्या आपल्या गाण्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करायच्या. त्यांच्या या सोशल मीडियावरील व्हिडीओजना फार मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळत होते. आजच्या डिजिटल काळातही त्या फार लोकप्रिय होत्या. 

हेही वाचा - धमाकेदार थ्रिलरनं भरलेल्या 'या' Web Series अजिबात मिस करू नका...

शारदा या फारश्या लाईमलाईटमध्ये नव्हत्या. परंतु त्यांची लोकप्रियता ही अफाट होती. आजही त्यांची गाणी ही ऐकली जातात आणि लोकांच्या मनात ही गाणी घरं करून आहेत. त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या पिढीतील कलाकारांना आणि श्रोत्यांना धक्का बसला आहे. शारदा यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार, यशुदास, आशा भोसले, मुकेश, सुमन कल्याणपूर अशा दिग्गज कलाकारांसोबत गाणी गायली आहेत. त्यासोबतच त्यांनी मराठी, इंग्लिंश, गुजराती आणि तेलुगू भाषांमधूनही गाणी गायली आहेत. आजची पिढीही त्यांच्या गाण्यांची फॅन आहे. सोबतच आजही त्यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे.