घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'सरकारने कितीही मदत केली तरी...'

होर्डिंग असावेत, पण त्यांची साईज लक्षात घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

नम्रता पाटील | Updated: May 19, 2024, 03:29 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'सरकारने कितीही मदत केली तरी...' title=

Bharat Ganeshpure On Ghatkopar Hoarding Accident : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 मे रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (51) याला उदयपूर येथून अटक करण्यात आली होती. तसेच हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचेही समोर आलं होतं. आता याबद्दल अभिनेते भारत गणेशपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारत गणेशपुरे यांनी नुकतंच 'हंच मीडिया' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना सोशल मीडियाच्या जगात होर्डिंग असणं गरजेचे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भारत गणेशपुरे यांनी सविस्तर उत्तर दिले. “होर्डिंग असावेत, पण त्यांची साईज लक्षात घेतली पाहिजे. लहानपणी आणि कॉलेजच्यावेळी आम्ही बॅनर लावायचो, तेव्हा आम्ही त्या बॅनरमध्ये छिद्र करायचो, जेणेकरुन वारा आला तर त्यामधून तो गेला पाहिजे. 

"मुंबईत जागोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग"

त्यामुळे आता जरी आपण होर्डिंगची साईज कमी केली आणि त्या होर्डिंगमध्ये छिद्र केले तर त्यातून वारा निघून जाईल. आजकाल होर्डिंगवरच्या जाहिरातील इतक्या जास्त झाल्या आहेत की जो येतो तो उठसूट जाहिराती करतोय. यात राजकीय, विविध उत्पादने, चित्रपट या सर्वांचा समावेश आहे. मुंबई शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले जातात. कारण ते येता जाता नागरिकांना ते दिसतं. पण याची योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर मग ते करु नये, असे मला वाटतं. 

आता जो अपघात झाला, तो खूप विचित्र होता. अक्षरशः निरपराध लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे. जेव्हा एक माणूस मरतो, तेव्हा त्याच्या कुटुंबातील पाच ते सहा जण वेठीस धरले जातात. त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. सरकारने कितीही मदत केली किंवा काहीही केलं, तरी तो जो माणूस गेलेला असतो, तो परत येत नाही. त्यामुळे माझी जाहिरात एजन्सीला विनंती आहे की, त्याची साईज वगैरे बघूनच काम केलं पाहिजे, असे भारत गणेशपुरे म्हणाले. 

"बॅनरसह नेता आडवा तिडवा"

"आपल्याकडे राजकीय पक्षांचे पण खूप होर्डिंग लागतात. गावाकडे तर इतकी बिकट परिस्थिती आहे की, जेव्हा नेत्यांचा वाढदिवस असतो, तेव्हा जे दिशादर्शक बोर्ड असतात त्यावर लोक बॅनर लावतात. तुमचा नेता आहे, त्यांचा वाढदिवस असेल तर तुम्ही बॅनर लावा. पण दुसऱ्या दिवशी ते काढून घ्या. यामुळे एकतर शहर स्वच्छ राहतं आणि ते बॅनर जर पुढच्या वाढदिवसापर्यंत राहिले तर त्या बॅनरसह नेता आडवा तिडवा होतो. मग तुम्हीच त्या नेत्याचा अपमान करताय असं होतं. 

त्यामुळेच मला कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही होर्डिंग लावा, पण दुसऱ्या दिवशी ते लगेच काढा. आता काय होतंय, महानगरपालिकेची शक्ती त्याच्यामागे लागली आहे. महानगरपालिकेची एक गाडी येते, ती या सगळ्या होर्डिंग्स आणि बॅनर काढते. हा खरंतर अपव्यय आहे. तर आपल्या नेत्याबद्दल खरंच प्रेम असेल तर तुम्ही लावलेलं होर्डिंग तुम्ही स्वत:च काढा", असे भारत गणेशपुरेंनी म्हटले.