'राजकारणात त्रास...', 'अनुपमा' फेम अभिनेत्रीच्या भाजप प्रवेशावर निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'तिला मिळालेली प्रसिद्धी...'

या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमा हे पात्र साकारत आहे. आता रुपाली गांगुलीने राजकारणात एंट्री घेतली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 2, 2024, 04:30 PM IST
'राजकारणात त्रास...', 'अनुपमा' फेम अभिनेत्रीच्या भाजप प्रवेशावर निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'तिला मिळालेली प्रसिद्धी...' title=

Rupali Ganguly Join BJP : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते'ला ओळखले जाते. 'अनुपमा' असे या मालिकेच्या हिंदी रिमेकचे नाव आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीतही सर्वोच्च स्थानी पाहायला मिळते. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमा हे पात्र साकारत आहे. आता रुपाली गांगुलीने राजकारणात एंट्री घेतली आहे. नुकतंच रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी रुपालीच्या राजकीय प्रवेशावर भाष्य केले आहे. 

रुपाली गांगुलीने 1 मे 2024 रोजी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. रुपालीने राजकीय एंट्री घेतल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यानंतर आता रुपाली ही अनुपमा मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर अनुपमा मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

तिच्यासारख्या लोकांची राजकारणात गरज

राजन शाही यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "रुपालीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने मी प्रचंड आनंदी आहे. ती खूप मेहनती आहे. ती कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे. रुपाली ही खूपच चांगली असून तिच्यासारख्या लोकांची राजकारणात गरज आहे." 

"मला खात्री आहे की ती ज्याप्रकारे सध्या काम करत आहे, त्याच प्रकारे ती राजकारणातही काम करत राहिल. अनुपमा या मालिकेमुळे तिला जी प्रसिद्धी मिळाली आहे, त्याचा वापर ती योग्यरित्या करेल. ती तिचे प्रत्येक काम हे व्यवस्थितरित्या करते आणि तिला राजकारणात कोणताही त्रास होणार नाही. तिच्या या नव्या प्रवासासाठी आम्ही कायमच तिच्यासोबत आहोत. जेव्हा स्मृती इराणी भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीला त्यांचा अभिमान वाटला होता. आता रुपालीनेही स्मृती इराणींकडून प्रेरणा घ्यावी आणि सिनेसृष्टीचे नाव मोठे करावे", असे राजन शाही यांनी म्हटले. 

हा कार्यक्रम सोडण्याचा विचारही नाही

दरम्यान रुपाली गांगुली यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या अनुपमा ही मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण फिल्मीबीटने सुत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गांगुलीसाठी 'अनुपमा' ही मालिका तिच्या बाळासारखी आहे. त्यामुळे ती हा कार्यक्रम सोडण्याचा विचारही करु शकत नाही. त्यामुळे राजकीय कारकिर्द सुरु केल्यानंतरही ती पूर्वीप्रमाणे मालिकेत दिसेल, असे सांगितले जात आहे. पण अद्याप यावर रुपाली यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.