लॉकडाऊन दरम्यान आकाश आणि वसुंधरा यांच्यातील संवाद

(लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झालंय. झाडं, पक्षी, प्राणी मोकळा श्वास घेतायत. यावरच आमच्या प्रतिनिधी सुवर्णा धानोरकर यांचा हा ब्लॉग. या ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्लॉग त्यांनी स्वतः चित्रबद्ध करण्याचाही प्रयत्न केलाय) 

Updated: Apr 13, 2020, 12:37 PM IST
लॉकडाऊन दरम्यान आकाश आणि वसुंधरा यांच्यातील संवाद title=

मुंबई : तसं तर माझं आणि आकाशचं सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण हळुहळु तुमचा हस्तक्षेप वाढायला लागला आणि आम्ही दुरावलो. कायमचेच दुरावलो असं वाटायला लागलेलं पण थँक्स टू कोरोना त्यानं आम्हाला पुन्हा जवळ येऊ दिलं. दरम्यानच्या काळात आमची अजिबात भेट झाली नाही असं नाही. भेटायचो क्षितीजावर... त्याचं भेटीवर समाधान मानायचो. पण माझ्या लेकी दुरावल्या. त्यांना धड पाहू शकत नव्हते मी. अधून मधून कधीतरी दिसायच्या. हाक मारायच्या. मिठीत घे म्हणायच्या. पण छे तुम्ही ते कधी होऊच दिलं नाही. तीनचार महिन्यापूर्वी काय झालं कुणास ठाऊक माझ्या कानावर सतत कोरोना का काय शब्द पडायला लागला. मग हळहळू चीन, इटली स्पेन, अमेरिकेमधून रडण्याचे भेसूर आवाज.. धस्स झालं. आता काय करावं, इतकं तर करते मी यांच्यासाठी... तरी रडारड? आकाश आणि मी भेटलो क्षितीजावर. खूप वेळ बोलत होतो. तो म्हणाला अगं विषाणू आहे तो. जगभर पसरलाय. औषध सापडलं नाही त्यावर अजून. काही दिवसांत परिस्थिती एकदमच बदललेली दिसली. 

सगळीकडे शांतता. मला त्यामुळं प्रसन्न वाटाय़ला लागलं. या शांततेत पक्षी प्राण्यांचे आवाजचं पानांची सळसळही स्पष्ट ऐकू यायला लागली. येवढंच काय नद्यांमध्ये माझ्या आकाशचं प्रतिबिंब दिसायचं मला. परवा गंगा तर खुप आनंदात होती. मला म्हणते आई अग इतकं छान वाटतंय ना अजिबात घाण वास नाही, कचरा नाही. निर्माल्य नाही. मोकळा श्वास... मलाही ती खूपच तरुण झाल्यासारखी वाटली.. म्हटलं अगं तू तर संतुर मम्माच दिसतेयस... मनमोकळं हसली. तितक्यात मोठंमोठे थेंब पडायला लागले अंगावर बघते तर काय आकाश रडत होता. काय झालं म्हटलं तर म्हणतो काही नाही ग आनंदाश्रु आहे. तू इथून खूप छान दिसतेयस, स्पष्ट दिसतेयस. झाडं, नद्या, पक्षी प्राणी स्पष्ट दिसताय मला. नाहीतर मोतीबिंदू झाल्यागत सगळं धुसर दिसायचं हिवाळा दिवाळीत तर काहीच दिसायचं नाही. आता दिसताय म्हणून डोळे भरून आले टपटप गळायला लागले मग म्हटलं कोसळावं असं अवेळी... मला माहितीय एप्रिलमध्ये मी असं रडणं म्हणजे बळीराजाला त्रासच पण काय ग करू कंट्रोल नही होता. 

बरोबरच होतं त्याचं त्याचाही बळीराजावर फार जीव, नेहमी म्हणतो मला हेवा वाटतो तुझा शेतकरी किती प्रेमाने माती हातात घेतो. मशागत करतो आपल्या हिरवाईची किती काळजी घेतो. मग मी त्याला भानावर आणते. हो रे करतो तो माझं दुखलं खुपलं प्रेमाने. पण त्यालाच जास्त रडावं लागतं ना... 

प्राणी तर म्हणतात आम्ही आमच्या पुर्वजांच्या आठवणी शोधायला जातोय घरांच्या आसपास. नाहीत ना लोक आता बाहेर, तेवढीच आमच्यासाठी चांगली संधी.. बघु काही सापडतंय का आजी आजोबांच्या आठवणीतलं... समजावलं त्यांना बाळांनो! तुम्ही जाताय पण लोक काय म्हणतायत माहितीय, जंगली प्राणी शहरात आले, आता त्यांना कोण सांगणार तुम्हीच जंगलं तोडली आणि अतिक्रमण केलंय... 

असो काहीही झालं तरी कोरोना आला आणि मला आकाश भेटला माझ्या लेकी चांदण्या भेटल्या. पक्षी तर नुसते अंगाखांद्यावर बागडत असतात. तुम्ही मला कितीही गृहित धरलंत, तरी माझा जीव आहे तुमच्यावर कसं पोरकं करेन मी तुम्हाला. पण जरा माझी विचार करा रे,  मी काय म्हणते सगळं सुरळीत झाल्यावर दर महिन्याला जर एखादा दिवस तुम्ही असाच लॉकडाऊन पाळलात तर...? मलाही माझ्या माणसांना भेटता येईल ना... बघा करा विचार 
तुमचीच वसुंधरा