Exclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं!

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच झी 24 तासला दिलेल्या मुलाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.  

नेहा चौधरी | Updated: May 18, 2024, 11:39 AM IST
Exclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं! title=
loksabha election 2024 Exclusive Uddhav Thackeray gave mental trouble to Anand Dighe too Chief Minister Eknath Shinde cleared everything

Eknath Shinde To The Point Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील शेवटचा आणि पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी सोमवारी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे प्रचारासाठी महाविकास आघाडीसह भाजप आणि शिंदे गट यांनी रात्रदिवस एक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कात प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरेही मंचावर उपस्थितीत होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समध्ये सभा घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला.

या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Exclusive) यांनी झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. एकंदरीत या मुलाखातीत एकनाथ शिंदे यांनी सगळंच काढलं, असं म्हणं वावग ठरणार नाही. 

'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' 

'आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची, उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला' असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टू द पॉईंट मुलाखतीत केलाय. कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी एकनाथ शिंदे यांना मुलाखतीत विचारलं की, राज ठाकरे यांनी सभेत आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तुम्ही फार पूर्वीपासून त्यांच्यासोबत राहिल्यात, मग दिघे आणि राज ठाकरेंचे संबंध कसे होते? त्यावर मुख्यमंत्री म्हणाली की, ''खूप चांगले संबंध होते. या चांगल्या संबंधांमुळे दिघे साहेब अनेक वेळा अडचणीत आले. राज ठाकरे काम करणारा माणूस. कधी कधी दिघे साहेब राज ठाकरेंबद्दल चांगेल बोलायचे. त्यांची बाजू लावून धरायचे. मग हे जे लोक त्यांना ते आवडायचं नाही. मग ती पोटदुखी व्हायची. दिघे साहेबांनाही मानसिक त्रास दिला. त्यांची एवढी लोकप्रियता होती. सभा, भाषण न देता एवढी लोकप्रियता मिळवणे सोपं काम नव्हतं. याबद्दल त्यांना मत्सर होता. नेतृत्त्वावर विश्वास स्वत:चा नसला की या सगळ्या गोष्टी घडतात. त्यांनीही दिघे साहेबांना खूप मानसिक ताप दिला. त्यांनी बरंच काही गोष्टी केल्यात. त्यांनी दिघे साहेबांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घालविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे संबंध खूप प्रेमळ आणि गुरु-शिष्याचे होते. हे जे बाकी लोक जे आहेत, त्यांना दिघेसाहेबांची लोकप्रियता सलत होती.''

काय म्हणाले एकनाथ शिंदे पाहा 

ही संपूर्ण मुलाखत तुम्ही झी 24 तास यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.