नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापले

नांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही. तब्बल 25 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होतात. 

Updated: May 18, 2024, 05:11 PM IST
नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापले title=

Nanded Pavedewadi Water Shortage : नांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही. तब्बल 25 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होतात. 

उन्हाळ्यात बोअर कोरडे पडल्याने अनेक नगरातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्यांची कुवत आहे ते पाण्यासाठी पैसे मोजून टँकरने पाणी खरेदी करतात. पण गोरगरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होतात. या भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पावडेवाडी ग्रामपंचायत करत आहे. पण टँकरची संख्या खूप अपुरी आहे. टँकर आल्यावर नागरिक टँकरवर तुटून पडतात. पाण्यासाठी मोठी कसरत करूनही अनेकांना पाणी मिळत नाही.

पावडेवाडी भागात मोठे नागरीकरण झाल्याने ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेसोबत करार केला. पण 20 दिवसांपूर्वी नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणातील पंपगृहाची मुख्य पाईलाईन फुटून बिघाड झाला होता. आठ दिवसानंतर तो बिघाड दुरुस्त होऊन नांदेड शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. पण पावडेवडीला मात्र पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आंदोलन केले. शहरात माणसं राहतात, मग ग्रामीण भागात माणसं राहत नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी पाण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

पंपगृहात बिघाड झाल्याने नांदेड शहराचा पाणीपुरवठा आठ दिवस बंद होता. तो हळूहळू सुरळीत होत आहे. नांदेड शहरालाच अजून पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे पावडेवाडीचा पाणीपुरवठा शक्य होत नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. पण त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून 55 हजार लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.