निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश

Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 10, 2023, 03:12 PM IST
निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश title=

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) मोठा अपघात घडला आहे. नाशिकमध्ये एका धावत्या शिवाशाही बसने (Shivshahi Bus) पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने सर्वानांच धक्का बसला. प्रवासी खाली उतरताच काही मिनिटांतच संपूर्ण बसने पेट घेतला. बघातच क्षणी संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये 25 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची कळताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.  शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

कार आणि ट्रकची जोरदार धडक, 8 जण जिवंत जाळले

उत्तर प्रदेशच्या बरेली इथल्या भोजीपुरा महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास डंपर आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. डंपरचा चालक जीव मुठीत घेऊन निसटला मात्र गाडीतील आठ जण जिवंत जळाले. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. एर्टिगा कार रात्री 11 वाजता बरेलीहून नैनिताल हायवेवरून बहेडीकडे जात होती. त्यावेळी महामार्गावरील भोजीपुराजवळ अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले, दुभाजक ओलांडून कार पलीकडे गेले. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरला कार जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की डंपर आणि कारला आग लागली. यानंतर गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने कोणालाच बाहेर पडता आले नाही आणि आठ जणांचा जळून मृत्यू झाला. महामार्गावरील टायरच्या खुणा पाहून डंपरने कारला सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे समोर आलं आहे.