ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीकरांवर पाणी संकट; शहराला पाणीपुरवठा करणारी जॅकवेल कोसळली

Sheel Dam Jack Well Collapsed: रत्नागिरी शहरावर मोठे पाणी संकट शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली पुढील २ दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता  

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 21, 2023, 09:43 AM IST
ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीकरांवर पाणी संकट; शहराला पाणीपुरवठा करणारी जॅकवेल कोसळली title=
Sheel Dam Jack Well Collapsed in ratnagiri Water Supply will Affected in city

Sheel Dam Jack Well Collapsed: ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे. त्यामुळं पुढील 2 दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जॅक वेल कोसळल्यानंतर कामगारांनी बाहेर उड्या मारल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, आता रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाची टांगती तलवार आहे. 

आज पहाटेच्या सुमारास जॅक वेल कोसळली आहे. पावसामुळं जॅकवेलची जमीन खचल्याने ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी नगरसेवक निमेश नायर,नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने शिळ धरणाकडे धाव घेतली आहे. ऐन गणेशोत्वसात रत्नगिरीकरांवर पाणी संकट ओढावू नये म्हणून पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एमआयडीसी व पानवळ धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. दुपारपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. 

1990च्या सुमारास ही जॅकवेल बांधण्यात आली होती. दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेअंतर्गंत नवीन जॅकवेलचे कामही सुरू आहे. मात्र, ही जॅकवेल सुरू करण्यास 15 ते 20 दिवसांचा वेळ लागू शकतो. तोपर्यंत शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. एमआयडीसी व पानवळ धरणातून आज दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पहाटे पाच वाजता सूचना देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याविषयीचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी शहराला एमआयडीसीतून रोज दहा एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने रहिवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेशोत्सवासाठी शहरातून चाकरमान गावात दाखल झाले आहेत. प्रत्येक घरा घरात मोठ्या संख्येने पाहुणे दाखल झाले आहेत. अशा परिस्थीत पाणीच नसल्याने मोठी अडचण होऊ शकते.