मोदींविरोधात वाराणसीत मराठा उमेदवार; खटले अंगावर घेतलेल्यांना राज्यात उमेदवारी

Loksabha Election 2024 Maratha Community Reservation Issue: अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून सकाळ, संध्याकाळ बैठकांचं आयोजन केलं जात आहे. उमेदवार उभे करण्यासाठी अनामत रक्कम गोळा करण्याच्या दृष्टीने वर्गणी गोळा करण्याचं नियोजन आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 11, 2024, 11:22 AM IST
मोदींविरोधात वाराणसीत मराठा उमेदवार; खटले अंगावर घेतलेल्यांना राज्यात उमेदवारी title=
मराठा उमेदवार देणार असल्याची माहिती समन्वयकांनी दिली (प्रातिनिधिक फोटो)

Loksabha Election 2024 Maratha Community Reservation Issue: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उतरवण्यासंदर्भातील हलचली सध्या मराठा समाजाकडून केल्या जात आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आता मराठा बांधवांनी 'अबकी बार एक गाव, एक उमेदवार' अशी घोषणा देत खरोखरच निवडणूक लढवण्यासाठी अगदी आर्थिक बाबींपासून इतर नियोजन सुरु केलं आहे. धाराशिवमध्ये शनिवारी यासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये उमेदवार कोण असावेत याच्या निकषांवर चर्चा झाली. या चर्चेमधून मराठा आंदोलनादरम्यान अंगावर केसेस घेतलेल्या तरुणांना उमेदवारी देण्यात यावी किंवा त्यांना प्राधान्य क्रम देण्यात यावा असं निश्चित करण्यात आलं आहे. हे निकष निश्चित करणारा धाराशीव हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याची माहिती मराठा समाजातील समन्वयकांनी दिली आहे.

प्रत्येक गावातून किती उमेदवार देणार?

मराठा समाजाने कधीही मागणी केली नव्हती अशा कोट्यातून 10 टक्के आरक्षण देऊन ते आमच्या माथी मारायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आहे. यापूर्वीही असं आरक्षण देण्यात आलं होतं आणि ते टीकलं नाही. आता दिलेल्या आरक्षणालाही न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळेच हे आरक्षण मान्य नसल्याचं सांगत शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा ठराव पास केल्यानंतरही प्रमुख आंदोलक असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं. मनोज जरांगे पाटील अजूनही गावागावांमध्ये जाऊन आपली मागणी नेमक्या कोणत्या आरक्षणाची होती आणि सरकारने काय दिलं आहे, याबद्दलची माहिती मराठा समाजाला देत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आणि दौऱ्याचं जरांगेंचं सत्र सुरुच आहे. असं असतानाच दुसरीकडे मराठा समाजाने थेट मतपेटीमधून राजकारण्यांना धक्का देण्याचा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार उतरवून जिंकवून आणण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. मोठ्या गावांमधून मराठा समाज किमान 2 तर लहान गावातून प्रत्येकी 1 उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. 400 ते 450 उमेदवार आजच्या तारखेला उभे करण्याच्या दृष्टीने मराठा समाजाची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पैसे आणि कागदपत्रांची तयारी

सध्या धाराशीवबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून सकाळ, संध्याकाळ बैठकांचं आयोजन केलं जात आहे. वरिष्ठांबरोबरची चर्चा, सल्ला मसतल याबरोबरच उमेदवारांसाठी अनामक रक्कम उभारण्यासंदर्भातील चर्चा केल्या जात आहेत. अनामत रक्कम भऊरण्यासाठी गावागावतून वर्गणी गोळा केली जाणार आहे. उमेदवारी अर्जासाठी कोणती कागदपत्रं लाहू शकतात त्याची माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. सध्या ठरवलेले निषक पूर्ण करणारा उमेदवार नसल्याने त्या खालोखाल पात्र उमेदवारांची दुसरी फळी तयार ठेवण्याची तयारी सुरु आहे.

मोदींविरोधात उमेदवार देणार

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याचा निषेध म्हणून सोलापूर, माढा आणि धाराशिवमधून मराठा समाज एक हजारपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून ऑनलाइन माध्यमातून उमेदवारी अर्ज मराठा समाजाकडून दाखल केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 'ज्या गावचा उमेदवार, त्याच गावचं मतदान असा पॅटर्न आम्ही राबवणार आहोत. हा पॅटर्न देशभरात राबवला जाईल. वाराणसीमधून महादेव तळेकर आणि संदीप मांडवे आमचे उमेदवार असतील,' अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाचे सन्मवयक माउली पवार यांनी दिली.