'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर

Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: उमरगा येथील जाहीर सभेमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा थेट उल्लेख करत त्यांना एका खास ऑफर दिली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 8, 2024, 02:07 PM IST
'नितीनजी भाजपा सोडा, राजीनामा द्या आणि...'; उद्धव ठाकरेंकडून गडकरींना जाहीर सभेत ऑफर title=
जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: धाराशिवमधील उमरगा येथील सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना एक ऑफर दिली. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना एक ऑफर दिली आहे.

एवढी गद्दारी यापूर्वी पाहिली नाही

राज्यामध्ये सुरु असलेल्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. "एवढी गद्दारी यापूर्वी महाराष्ट्रात कधी झालेली नाही. एवढा लाळघोटेपणा महाराष्ट्राने यापूर्वी कधी बघितला नव्हता. मला ओमराजेंचा अभिमान का वाटतो? कारण ओमराजे लोकसभेमध्ये तुमचे सर्वांचे प्रश्न त्या मोदींसमोर ताठ मानेने विचारतो. इतर कोणाची हिंमत नाही. ओमराजेंनी शेतकऱ्यांचे प्रस्न मांडलेत. ओमराजे आरक्षणावर बोललेत. त्यावेळेला मी सांगत होतो की त्यावेळी महाराष्ट्रातील जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे त्यांनी राजीनामा मोदींच्या तोंडावर मारुन बाहेर यायला पाहिजे होतं. आता सगळे रांगेत उभे आहेत. आमचं काय आमचं काय आमचं काय करत उभे आहेत," असं म्हणत ठाकरेंनी टीका केली.

भ्रष्टाचाराचे आरोप करुन पहिल्या यादीत मोदींबरोबर नाव

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी थेट नितीन गडकरींचं नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत नसून भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या कृपाशंकर सिंह यांचं नाव मात्र असल्याचं नमूद केलं. "मला काही वेळेला लाज वाटते. मी 2 दिवसांपासून बोलतोय. भाजपाची पहिली यादी जाहीर होऊन चार दिवस झाले. 195 जणांची यादी जाहीर केली. वाचली तुम्ही नावं? नरेंद्र मोदींचं नाव आहे. अमित शाहांचं नाव आहे. आणखीन कोणाकोणाची नावं आहेत. त्यात आणखीन एक नाव आहे कृपाशंकर सिंह. काँग्रेसमधून यांच्या उरावर आलेले. त्यांच्यावर याच भाजपावाल्यांनी बोंबलत बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचं सांगत होते. त्या बेहिशोबी संपत्ती गोळा करणाऱ्याचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुझवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंच्याबरोबरीने आणि त्यांच्यानंतर युतीमध्ये मेहनत करणाऱ्या नितीन गडकरींचं नाव त्यामध्ये नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा

नितीनजी भाजपा सोडून घ्या आणि...

"नितीनजी भाजपा सोडून द्या. राहा उभे आम्ही महाविकास आघाडीकडून तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा. महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला आग्र्यामध्ये कधी झुकले नव्हते. ना तो त्यावेळेला झुकला तो यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय की द्या राजीनामा आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी," असं उद्धव ठाकरे गडकरींना महाविकासआघाडीमधून निवडणूक लढण्याचं आवाहन करताना म्हणाले.