'मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात...' अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप

Shirur Loksabha 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Updated: May 10, 2024, 04:45 PM IST
'मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात...' अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप title=

Shirur Loksabha 2024 : शिरूर लोकसभेच्या हद्दीतील पीडिसीसी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांशी (Shivajirao Adhalarao Patil) संबंधित पतसंस्थेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावावा, अशी मागणी मविआ उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडिसीसी बँक (PDCC Bank) सुरू होती. या बँकेत पैसे वाटप झाला, असा आरोप विरोधकांनी केला होता. म्हणूनच या बँकेने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला. 

पैसे वाटप होण्याची ही शक्यता शिरूर लोकसभेत ही आहे. म्हणूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांशी संबंधित भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक शाखा आहेत. तिथून हा पैसा वाटप होईल, ही भीती कोल्हेना आहे. म्हणूनच त्यांनी या बँका आणि पतसंस्थांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.

शिरुरची लक्षवेधी लढत
बारामतीनंतर संपूर्ण राज्याचं हायव्होल्टेज लढत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय. राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा हा सामना आहे. त्यामुळे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचं आव्हान असणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा व सर्वाधिक मतदार संख्या असलेला मतदार संघ म्हणूनही शिरूरकडे पाहिलं जातं.

शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवार देताना अजित पवार गटाला मोठे राजकीय प्रयत्न करावे लागले. अखेर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. बारामतीतील लोकसभेचे मतदान संपताच शरद पवार आणि अजित पवार शिरूरच्या मैदानात उतरले आहेत.

शिरूरचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीच्या विलास लांडेंचा पावणे दोन लाखांनी पराभव केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकमांना तब्बल 3 लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीनं टीव्हीच्या पडद्यावर छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे ख्यातनाम अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी दिली. त्यांनी आढळरावांचा 58 हजार मतांनी पाडाव केला आणि अगदी मोदी लाटेतही शिरूरचा गड जिंकला. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरुर, खेड - आळंदी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि भोसरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात.  2019 साली भोसरीचा अपवाद वगळता 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले.