सिटी स्कॅन : नाशिकमध्ये... मनमानी करतोय रिक्षावाला!

नाशिक शहरातल्या रिक्षाचालकांची मनमानी अशी की कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नाही

Updated: Dec 4, 2019, 04:45 PM IST
सिटी स्कॅन : नाशिकमध्ये... मनमानी करतोय रिक्षावाला! title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : सत्तास्थापनेच्या गदारोळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वसामान्य दुर्लक्षित राहतो की काय? अशी स्थिती आहे. राज्यातल्या शहरांचा श्वास कोंडलाय. या शहरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'झी २४ तास'च्या 'सिटी स्कॅन' या बातमीपत्रातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आज नाशिक शहराचं सिटीस्कॅन...

नाशिक शहरातल्या रिक्षाचालकांची मनमानी अशी की कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नाही. शहरात अनेक ठिकाणी पॉईंट टू पॉईंट शेअर पद्धतीने किंवा मनमानी पद्धतीनेच वाहतूक केली जाते. नाशिक रोड ते शालिमार, सीबीएस ते सिडको, आडगाव, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, स्टेट बँक ते पाथर्डी, आडगाव ते रविवार कारंजा असे अनेक स्टॉप आहेत. प्रत्येकाचं भाडं या स्टॉपवर प्रति व्यक्तिनुसार ठरलंय. काही ठिकाणी ही चांगली गोष्ट असली तरी ज्यांना थेट रिक्षा हवी आहे, त्यांची पंचईत होते. पॉईंट टू पॉईंट सोडून अन्य ठिकाणी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने भाडं आकारलं जातं.

नाशिकचा विस्तार बारा ते पंधरा किलोमीटरच्या दरम्यान आहे. या शहरात शालिमार ते नाशिक रोड या टप्प्यात एका मिनिटाला शंभरहून अधिक रिक्षा धावतात. मुख्य शहरात येण्यासाठी हा एकमेव मार्ग नाशिक रोड स्टेशनला जोडलाय. त्यामुळे शहरात येणाऱ्या या मार्गावर पर्यटक, यात्रेकरूंकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जातं. रिक्षाला लागलेले मीटर केवळ नावापुरते... ओला, उबेरला मात देण्यासाठी रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे सेवा देण्याचा विचार केलाय. मात्र शहरात मीटरप्रमाणे भाडं या रिक्षाचालकांना परवडत नाही असा काहींचा दावा आहे.

मध्यंतरी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर एका संस्थेमार्फत प्रिपेड रिक्षा सेवा देण्याचा प्रयोग झाला, पण हे दर एवढे जास्त होते की ही सेवा बंद पडली. 

नाशिक मंदिरांची नगरी ही पर्यटन नगरी म्हणून देशात सुप्रसिद्ध आहे. आता हीच नगरी मदिरेची नगरीसुद्धा होते 'वाईन कॅपिटल'च्या रूपाने... वर्षाला लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. इथल्या दऱ्या-खोऱ्यात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांना सर्वसामान्य नाशिककरांना एकच समस्या भेडसावते ती म्हणजे रिक्षाची... इथले रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आणि पर्यटकांची फसवणूक करतात. दराप्रमाणे भाडं आकारला जात नाही ही इथली प्रमुख समस्या आहे.

परवाना नसणाऱ्या रिक्षातून होणारी वाहतूक हा आणखी एक कळीचा मुद्दा... अनेक रिक्षाचालक प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवतात. रॉकेलवर रिक्षा चालवल्या जातात. रिक्षाचालकांकडे बिल्ला नसतो. प्रवाशांशी दादागिरी सुरू असते. त्यातच शहरातली सिटी बस सेवा मृतप्राय आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांची दादागिरी सहन करण्याखेरीज पर्याय नाही अशी स्थिती आहे. 

नाशिक शहर महापालिकेने परिवहन सेवेसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल सेवा दिली आहे अनेक सायकली बॅटरीवरसुद्धा चालतात तर शहर बस वाहतूकही प्रस्तावित आहे मात्र ती सुरु न झाल्यामुळे परिवहन मंडळाच्या जुन्या बसेसवर सध्या कारभार सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांना रिक्षा प्रवासावर अवलंबून राहावे लागते.

शहरात परिवहनची सिटी बस सेवा नावाला आहे. मात्र या सेवेला घरघर लागलीय. स्मार्ट सिटी अंतर्गत सीएनजी आणि बॅटरीवरील अंतर्गत बस सेवेचा शुभारंभ प्रलंबित आहे. ठेका कोणाला द्यायचा यावरून वाद सुरू आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी शिकस्त केलीय. मीटर बंधनकारक केले, पण त्याला यश आलेलं नाही. आता थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यात स्टींग ऑपरेशन करून लक्ष घालण्याचं सुतोवाच केलंय.

शहरात तीन पद्धतीच्या रिक्षा धावतात. शेअर रिक्षा, प्रिपेड रिक्षा आणि मीटर रिक्षा... या वर्गीकरणानुसार अंमलबजावणी झाल्यास प्रवास सुखकर होईल आणि रिक्षाचालकांचेही प्रश्न सुटतील. पोलीस, मनपा, आरटीओ या सर्वांनीच सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे.