लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा

Delhi Gym Trainer Murder : दिल्लीत जिम ट्रेनर मुलाची वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही तास आधीच वडिलांनी मुलाची हत्या करुन पळ काढला होता.

आकाश नेटके | Updated: Mar 9, 2024, 09:02 AM IST
लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा title=

Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली. चाकूने तब्बल 15 वार करुन पित्याने मुलाला संपवून पळ काढला. आरोपी पित्याला पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. हत्येनंतर पित्याने मला याचा कोणताही पश्चाताच नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पित्याने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वानाच जबर धक्का बसला आहे.

जिम ट्रेनर असलेल्या 29 वर्षीय गौरव सिंघलची वरात निघण्याच्या काही तास आधी त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येनंतर आरोपी वडील जयपूरला पळून गेला. तेथून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. गौरवच्या वडिलांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी, 6 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. रंगलाल सिंघल असे मृत गौरवच्या वडिलांचे नाव आहे.

आपल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी हा गुन्हा केला आहे, रंगलाल सिंघलने पोलिसांना शुक्रवारी सांगितले. तीन ते चार महिन्यांपासून तो हत्येचा कट रचत होता, असे तपासात उघड झाले आहे. आपल्या मुलाकडून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि आपल्या पत्नीला दुःखी पाहायचे होते. त्यामुळे आपण मुलाची हत्या केल्याची कबुली रंगलाल सिंघलने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आणि त्याची आई रंगलालपासून वेगळे राहत होते. गौरव आणि रंगलाल सिंघल हे देवळी एक्स्टेंशनमध्ये एकाच भागात राहत होते, पण वेगवेगळ्या घरात. ही घटना घडली तेव्हा गौरव त्याच्या घरी होता. रंगलालने घरात घुसून गौरवची हत्या केली. कुटुंबीयांनी गौरवला तत्काळ साकेत येथील मॅक्स रुग्णालयात नेले. मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गौरव रंगलालशी रोज शिवीगाळ व गैरवर्तन करायचा. महिनाभरापूर्वी गौरवने त्याला शिवीगाळ देखील केली होती. पत्नीनेही मुलाला साथ दिली आणि त्याच्याशी कधीच नीट बोलत नव्हती. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि पत्नीला आयुष्यभर त्रास देण्यासाठी रंगलालने गौरव याला मारले. त्यानंतर रंगलालने टॅक्सी बुक करून जयपूर गाठले. त्याला अजमेरला स्थायिक व्हायचे होते. त्यामुळे त्याने घरातून 50 लाख व 15 लाखांचे दागिने घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने, पैसे, कात्री आणि एक रॉड जप्त केला आहे. 

चार महिन्यांपासून सुरु होती तयारी

चार महिन्यांपासून रंगलाल आपल्या मुलाला मारण्याच्या तयारीत होता, पण त्याला संधी मिळत नव्हती. बुधवारी सर्वजण लग्नाच्या आनंदात व्यस्त असताना मुलाला दुसऱ्या घरी बोलावून त्याने खून केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचायतीत गौरवने रंगलालचा अपमान केला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या वादादरम्यान गौरवने रंगलालच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे रंगलालला संताप अनावर झाला आणि त्याने मुलाची हत्या केली.