स्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Delhi Crime : दिल्लीत 19 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका माजी नौदल कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 2004 साली घडलेल्या गुन्ह्यांच्या आरोपीला दिल्लीतून पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 18, 2023, 12:23 PM IST
स्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले title=

Crime News : काही गुन्ह्याची प्रकरणं ही इतकी किचकट असतात की पोलिसांना कित्येक वर्षे याचा गुंता सोडवता येत नाही. असचं एक प्रकरण दिल्लीतूनही (Delhi Crime) समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी 19 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात एका भारतीय नौदलाच्या (Indian Navy) माजी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. 2004 साली दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी सुरू केली होती. मात्र आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. ज्या व्यक्तीच्या मृत्यूची इतकी वर्षे दिल्ली पोलीस चौकशी करत होते तिच आता जिवंत सापडली आहे. स्वतःला मृत घोषित करून या माजी नौदल कर्मचाऱ्याने मोठा कट रचल्याचं आता उघड झालं आहे.

बालेश कुमार असे दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो हरियाणाचा असून बालेश कुमारने स्वतःला 2004 मध्ये मृत घोषित केलं होतं. मात्र आता तो जिवंत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासामध्ये धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपी बालेश कुमारविरुद्ध दिल्लीच्या बवाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा आणि टिळक मार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये बालेश फरार होता. 

हत्या आणि चोरीच्या प्रकरणातील आरोपी बालेश कुमार हा दिल्लीतच ओखळ बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. अमन सिंह नावाने तो नफजगडमध्ये राहत होता. पोलिसांनी तिथे सापळा रचून आरोपी बालेश कुमारला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरु केली. तपासादरम्यान गुन्हे शाखेने त्याच्या पेन्शन फॉर्मची माहिती मिळवली. त्यावेळी आरोपी बालेश कुमारची पत्नी त्याच्या पेन्शनचा लाभ घेत असल्याचे समोर आले.

1 मे 2004 रोजी बालेश कुमार राजस्थानमधील जोधपूर येथे होता. जिथे त्याने आपला ट्रक पेटवून दिला होता. यामध्य दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये बालेश कुमारचाही समावेश होता अशी माहिती सुरुवातीला पुढे आले होते. बालेश कुमारला हत्येच्या आणि चोरीच्या गुन्ह्यातून कायमची सुटका हवी होती. या घटनेनंतर बालेशचा मृत्यू झालाय असंच लोकांना वाटायला लागलं. त्यामुळे दिल्लीतल्या या प्रकरणाचा तपास लांबला. दुसरीकडे बालेश कुमार दिल्लीत परतला आणि अमन सिंह बनून राहू लागला. यावेळी बालेशने अमन सिंहच्या नावाने आधार कार्ड, बॅंक खाते, पॅन कार्ड अशी कागदपत्रे देखील तयार केली होती. ओळख आणि पत्ता बदलल्यानंतर बालेश प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होता. मात्र गुन्हे शाखेने तपास करुन बालेश कुमारला तब्बल 19 वर्षांनी अटक केली आहे.