सीआयडी मालिका बंद का झाली? तब्बल 6 वर्षांनी खरं कारण आलं समोर

Why CID Programme Stop : 'अंतर्गत राजकारण, 2016 पासून कार्यक्रम बंद करण्यासाठी चाललेले प्रयत्न अन्...', सीआयडी मालिका बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर  

Updated: Jan 21, 2024, 04:37 PM IST
सीआयडी मालिका बंद का झाली? तब्बल 6 वर्षांनी खरं कारण आलं समोर title=

Why CID Programme Stop : टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणून ‘सीआयडी’ला ओळखले जाते. या मालिकेने लहान मुलांपासून थोर मोठ्यांची मनं जिंकली. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे आजही लोकप्रिय आहेत. या मालिकेने 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी ही मालिका बंद होण्यामागचे खरं कारण समोर आले आहे. 

सीआयडी या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, अंशा सय्यद, आदित्य श्रीवास्तव, नरेंद्र गुप्ता या कलाकारांनी नुकतंच सिंगल हँडली या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना सीआयडी ही मालिका लवकर का बंद झाली? अशा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सीआयडी फेम दयानंद शेट्टी म्हणजे दयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

"अंतर्गत राजकारणामुळे कार्यक्रम बंद"

यावेळी दया म्हणाला, "जेव्हा एखादी गोष्ट सुरु होते, ती कधी ना कधी संपतेच. प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी आहे. प्रत्येक गोष्टीची एक लाईफलाईन असते. प्रत्येक गोष्टीची मुदत संपण्याची एक ठराविक तारीख असते. तशीच या कार्यक्रमाचीही होती. सीआयडी हा कार्यक्रम 21 वर्ष चालला, जी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण 21 वर्ष ज्याप्रकारे या कार्यक्रमाची क्रेझ वाढत गेली, ते पाहता हा कार्यक्रम बंद करण्याची गरज नव्हती. पण यामागे काही अंतर्गत राजकारण असू शकते किंवा मग त्या कार्यक्रमाचे आयुष्यचं तितके असेल. हा कार्यक्रम अचानक बंद झालेला नाही." 

"2016 पासून कार्यक्रम बंद करण्याचे प्रयत्न"

"2016 पासून हा कार्यक्रम बंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरु होते. ज्याप्रमाणे रस्त्याचे एखादे झाड तुम्हाला कापता येत नाहीत, मग काही लोकं हळहळू त्याला इंजेक्शन देतात आणि मग त्यानंतर ते झाडं मरतं, असंच काहीसं या कार्यक्रमाबरोबर झालं. आम्हाला असं वाटतं की कदाचित आमच्या कार्यक्रमाचे निर्माते त्यांना आवडत नसावेत. सीआयडीच्या निर्मात्यांनी बाहेर जावं, अस त्यांना वाटत होतं. 

त्यावेळी आमच्या सर्व कलाकारांसोबत एक मिटींग झाली. त्यावेळी ते म्हणाले होते, जर आम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना बदललं तर तुम्ही काम कराल का? त्यावेळी आम्ही कलाकारांनी नकार दिला. कारण आमची निष्ठा त्याच निर्मात्यासोबत असेल, ज्याच्याबरोबर आम्ही तो कार्यक्रम सुरु केला. 21 वर्ष हा खूप मोठा कार्यकाळ आहे आणि आमचे त्यांच्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचे संबंध होते. त्यामुळे कोणीतरी शेवटच्या क्षणी आम्हाला येऊन एखादी गोष्ट ऑफर करतंय आणि आम्ही तो कार्यक्रम दुसऱ्या व्यक्तीबरोबर करावा, हे आम्हाला योग्य वाटलं नाही", असेही दयानंद शेट्टी म्हणाला. 

"आम्हालाही या कार्यक्रमाची आठवण येते"

त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर आम्हाला निर्मात्यांनी स्वत:हून सांगितलं तर आम्ही कोणाबरोबरही काम करु. पण निर्मातेही कार्यक्रमाबद्दल इमोशनल होते. सीआयडी हे बी.पी सिंग यांनी सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. त्यामुळे ते कायम त्यांचंच असावं असं आम्हाला सर्वांनाच वाटत होतं. पण आम्हाला या कार्यक्रमाची नक्कीच आठवण येते, असेही दयानंद शेट्टी यांनी यावेळी म्हटले.