हा 'डे' नव्हे 'संस्कार' आहे

साधाल ना शरीराशी संवाद? पुरवाल ना त्याचे लाड?

Updated: Jun 20, 2021, 02:36 PM IST
हा 'डे' नव्हे 'संस्कार' आहे title=
सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई  : आपण नेहमीच संवाद साधतो. कधी स्वतःशी कधी आपल्या माणसांशी... पण कधी स्वतःच्या शरीराशी संवाद साधलाय? नसेलच... कदाचित मी असं काय विचित्र विचारतेय असं वाटत असेल तुम्हाला... आपल्याला वेळच नसतो शरीराशी बोलायला. शरीराविषयी बोलतो आपण... मुलीतर फार बोलतात एकमेकींच्या शरीराविषयी. तिचे हात बघ, तिच्या थाईज् बघ, तिचे काफ, तिची हाईट, तिच्या हेअरलेंग्थ, तिचा फेस, तिचे डोळे आणखी बरचं काहीबाही... असं बोलत असताना,  स्वतःच्या शरीराबाबत तोंड वाकडं करतात. 
 
मी कधी बारीक होईन यार, हे वाक्य ठरलेलं असतं. आपण हे कधीच समजून घेत नाही की जे आहे त्याचा सन्मान करावा आधी... मग बाकी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. शरीराचा सन्मान करणं याचा कधी आपण विचारही केला नसेल, जी खरी गरज आहे. बारीक शरीर काय कधीही मिळवता येईल, पण आधी तंदुरुस्त शरीर मिळवुया ना...
 
कुठल्याही व्याधी शरीराला जडण्यापेक्षा आपण शरीराशी आधीच संवाद साधला तर व्याधी जडतच नाही, किंवा जडल्याच तरी फारसा त्रास होत नाही. शिवाय व्याधीशी लढण्यासाठी आपण मानसिकरित्या सक्षम असतो. हे सक्षम असणं मिळतं शरीराशी साधलेल्या संवादामुळे.  आम्ही मोबाईलवर तासन् तास राहतो. गॉसिप करायला हवा तेवढा वेळ देऊ शकतो. पण शरीराला येवढा वेळ देत नाही. 
 
आम्हाला तर आंघोळ करतानापण घिसाडघाई असते. किती घाईत असतो आपण. ना धड आंघोळ करत ना धड जेवण करत. जेवतानाही त्या जेवणाचा आनंद घेत नाही. मीठच कमी आहे तिखटच खूप आहे, सतत तक्रारी. ना त्या जेवणाचा शरीराला फायदा होत. ना मनाला. हो, मनाच्या सुदृढतेसाठी जेवतानाही प्रसन्न राहायला हवं. अनेकांना ताट समोर आलं की जेवणाला नावं ठेवायची सवय असते.
 
 त्यामुळे जेवण अंगी लागत नाही. त्यात त्या जेवणाचाही अपमान आणि अन्नपूर्णेचाही... तिची मेहनत, तिनं तिच्या पाककलेत ओतलेलं प्रेम, सगळं आपण क्षणात मातीमोल करतो. या अशा चिडचिड करण्याच्या, सगळ्याच गोष्टीत नुक्स काढण्याच्या सवयी का लागतात माहितीय? आपण शरीराशी अबोला धरतो ना म्हणून. अबोला धरतो म्हणण्यापेक्षा त्याला गृहित धरतो.  
 
इतकं छान शरीर. मनुष्याचा जन्म म्हणजेच मुळी एक चमत्कार आहे. मग हा चमत्कार जपायला नको... तो जपण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायचीय. शरीराशी संवाद साधायचाय आय मिन व्यायाम करायचाय.  एरवी तर व्यायाम करा म्हटलं की आपल्याकडे मोठं कारण तयार असतं, 'वेळच मिळत नाही कधी करू व्यायाम...’ हे कारणच आपला घात करत असतं. हे वाक्य ऐकलं की शरीर रडतं माहितीय? 
 
 त्याला वाटतं येवढ्या कामात माझ्यासाठी काही मिनिटं असू नये...? इतकं खरंच कुणी बिझी असतं...? माझ्यासाठी तर तू वेळ काढायलाच हवा.  माझ्याशिवाय कुठे तुझं अस्तित्व? मी थांबलो तर काय होईल...? तुझी ओळख काय माझ्याशिवाय...?  काही व्याधी जडण्याआधीच चांगलं शरीर कमावलं तर... ते कमवायला मेहनत घ्यावी लागेल. ती शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, ते राहुल गांधी, किरण रिजिजू, अक्षय कुमार, सलमान खान, सुनील शेट्टी यांनी मेहनत घेतली शरीरावर म्हणून छान दिसतात. अगदी या वयातही. 
 
आपल्या आसपास नजर टाका जरा आणि बघा चाळीशीतला, पन्नाशीतला माणूस कसा दिसतो आणि तो पन्नाशीतला अक्षय कुमार, राहुल गांधी बघा... आता असं म्हणऊ नका की त्यांना काय काम असतं उठसुट कधीही व्यायाम करु शकतात. तसं नाहीये, उलट स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.  त्यांना काय टेन्शन नसेल कुठलं...? असतं.  आपल्यापेक्षा जास्त असतं. 
 
कामही खूप असतं. मानसिक थकवा देणारं आणि शारिरीकरित्याही दमवणारं. तरीही ते छान फ्रेश आणि तंदुरुस्त दिसतात. कितीही कामात असले तरी ते व्यायाम करतातच.  थोडक्यात काय त्यांच्या शरीराशी संवाद साधतात.  हा संवाद अगदी लहान वयापासून साधायला हवा.  शाळेत पीटीच्या पिरीएड अनेकजण बंक करायचे. पण तो किती आवश्यक असतो ते आता कळत असेल काहींना.  
 
मला तर पीटीचा पिरीएड कायम आवडायचा. असं वाटायचं की गणित, इंग्रजी, मराठीसारखाचं पीटीचा पिरिएडपण रोज असायला हवा. पण त्यावेळी कुठल्या शाळांनीही खेळाकडे किंवा मुलांच्या फिटनेसकडे फारसं लक्ष दिलं नाही. आज प्रोफेश्नली काही शाळा मुलांच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला लागल्या. पण त्यासाठी पालकांनाही खिसा हलका करावा लागतो. पण डॉक्टरकडे खिसा हलका करण्यापेक्षा मुलांच्या फिटनेससाठी थोडे पैसे खर्च केलेले जास्त चांगले नाही का... 
 
लहान वयातच व्यायामाचं महत्त्व कळलं तर तो संस्कार आयुष्यभर टिकतो. मुलांकडून मित्रमैत्रिणींनाही दिला जातो. आणि हे देणं असंच वाढत जातं.  हे असं देणं सध्या मोबाईल गेमच्या बाबतीत होतंय. जे कुणाच्याच शरीरासाठी चांगलं नाही. मोबाईलनं मेंदु बिझी राहिलं पण मन कमकुवत होत जाईल. मन कमकुवत झालं की शरीराला कमजोर व्हायला फार वेळ लागत नाही. मन कमकुवत असलं की कुठलाही आजार लगेच जडतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हातात हात घालून चालत असतात.  म्हणून तर म्हटलं शरीराशी बोला.   
 
 आजवर बोलला नसाल तर आजपासून बोला. पहिल्याच दिवशी तासभर बोललं पाहिजे असं काही नसतं. किमान ५ मिनिटं बोला हळूहळू इतकी छान सवय लागेल की रोज १ तास बोलला तरी कमीच वाटेल. बरोबर स्वतःसाठी वेळ काढता येईल. नसेल जमत जर प्रत्येक कामातून वेळ चोरायला शिका. जेवायला १ तास लागत असेल तर त्यातली १० मिनिटं चोरा, आवरायला १ तास लागत असेल तर त्यातली १० मिनिटं चोरा असं करत करत २४ तासातला १ तास यूं यूं चोराल, आणि व्यायामाला तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. 
 
आपल्याला काही त्या हृतिक आणि टायगर श्रॉफसारखं पिळदार शरीर कमवायचं नाहीये. किंवा त्या मलायकासारखंपण काही करायचं नाहीये. पण किमान थकवा जाणवणार नाही, स्वतःला दिवसभर फ्रेश वाटेल इतका तर व्यायाम करुया. यात वैयक्तिक फायदा आहे. आत्मविश्वास वाढतो.  आपण व्यायाम केल्यानं दुस-याचा फायदा होत नाही. हं येवढं मात्र नक्की व्यायाम करून आपण प्रसन्न राहतो आणि त्यामुळे आपल्या आसपासची प्रत्येक व्यक्तीही आनंदात राहते. 
 
प्रत्येकाला आपल्याशी बोलावसं वाटतं. आपला सहवास आवडतो.  आहे की नाही गंमत या संवादाची... येवढा फायदा असेल शरीराशी संवाद साधण्याचा तर मग शरीराशी बोलायलाच हवं ना. साधीसोपी योगासनं, सूर्यनमस्कार जरी रोज केले तरी आपल्याला खूप फायदा होतो. असं म्हणतात की पार्वतीच्या पश्चात शिवशंकरानं स्वतःला योगासनामध्ये बिझी ठेवलं. शिवानं जवळपास ८४ लाख योगासनं केली असंही म्हटलं जातं. 
 
मुख्य ८४ योगासनं आहेत त्यातला एक प्रकार जरी केला तरी किती फायदा होईल आपला.  पण आता फक्त विचार करु नका. कामाला लागा. शरीरातला प्रत्येक अवयव म्हणजे एक मन असतं. त्या मनाची भाषा समजून घेऊया. ते प्रत्येक मन प्रसन्न ठेवुया.  शरीराला छान शिस्त लावुया. या जागतिक योगदिनी रोज शरीराशी बोलण्याचा संकल्प करुया. उद्या व्यायाम करते/करतो म्हणत चादर ओढून पुन्हा ताणून देण्यापेक्षा छान व्यायाम करुया. 
 
योगासनं करुया. तसंही आपल्याला पाश्चात्यांनी सांगितलेल्या गोष्टी जास्त आवडतात, पटतात. मग करा योगासनं. भारतानं जगाला दिलेलं हे शास्त्र जपुया. जागतिक योग दिनामुळे अनेकांना योगासनांचं महत्त्व पटायला लागलंय. पण त्या व्हॅलेंटाईन डे, वुमेन्स डे, फादर्स डे, मदर्स डे आणि इतर सगळ्या डेज सारखं या योगा डेचं नको व्हायला. कारण या डेचा संबंध थेट आपल्या शरीराशी आहे. त्याला काय हवं नको बघा, त्याच्या आवडीनिवडी जपा. 
 
त्याला काय खायला आवडतं ते त्याला विचारा... बघा ते नक्की सांगेल 'तुझी आजी बनवायची ते थालीपीठ खाऊ घाल, तुझी आई बनवते ती भाकरी खाऊ घाल.’ तुमचं शरीर सगळ्या भारतीय पदार्थांची यादी सांगेल... वर त्याचं एक वाक्य तर ठरलेलंच असेल... 'प्लीज! डाएट नको करु, मला उपाशी नको ठेऊ, सगळं चांगलचुंगलं खा,  तुझ्या फुड कल्चरमधलं सगळं खा, पण ते पिझ्झा, बर्गर, कोक वगैरेपासून जरा जपूनच... नाहीतर माझी वाट लावशील...’ मनमानी डाएटच्या नादी लागून अनेकांनी आजारपणं
 
ओढून घेतलीयत. त्यापेक्षा छान व्यायाम करून पौष्टिक आहार घेणं योग्य.  हवं तर कुठल्याही सेलिब्रिटींना विचारा त्यांचंही हेच म्हणणं असेल. डाएट म्हणजे काय तर तुमची आहार संस्कृती जपा. तेच खा जे तुमच्या भागातल्या वातावरणाला अनुकूल आहे. तेच खा ज्याने पोट, मन भरतं, शरीराला पोषण मिळतं. योगासनं करा, व्यायाम करा.  मग काय साधाल ना शरीराशी संवाद? पुरवाल ना त्याचे लाड?
 
SOCIAL MEDIA ACCOUNTS:
TWITTER: @suvarnayb
FACEBOOK:  /suvarnamdhanorkar
INSTAGRAM: /suvarnadhanorkar
BLOG: suvarnadhanorkar.blogspot.com