मनस्वी रंगकर्मी - गिरीश कर्नाड

ज्येष्ठ लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरिश कर्नाड यांचं निधन झालयं. गिरिश कर्नाड हे ८१ वर्षांचे होते. साहित्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या या मनस्वी रंगकर्मीच्या जाण्यानं संपूर्ण साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होतेयं. 

Updated: Jun 10, 2019, 08:12 PM IST
मनस्वी रंगकर्मी - गिरीश कर्नाड title=

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : ज्येष्ठ लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरिश कर्नाड यांचं निधन झालयं. गिरिश कर्नाड हे ८१ वर्षांचे होते. साहित्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या या मनस्वी रंगकर्मीच्या जाण्यानं संपूर्ण साहित्यविश्वात हळहळ व्यक्त होतेयं. गिरिश कर्नाड, जन्म १९ मे १९३८, माथेरानच्या निसर्गरम्य कुशीत जन्मलेल्या या मनस्वी लेखकाचा चौफेर प्रवास अचंबित करुन जातो.

भारतीय साहित्यविश्वाला आपल्या तळपत्या लेखनीने नवी ओळख देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. गिरिश कर्नाड. ययाती, हयवदन, तुघलक, नागमंडल अशा मराठी नाटकांचं दिग्दर्शन गिरिश कर्नाड यांनी केलयं.. या नाट्य कलाकृतींमुळे आजचे युवा रंगकर्मीही भारावून जातात. नाटकाची भाषा कशी असावी ती प्रेक्षकांपर्य़ंत कशी पोहचावी..कलाकारांचा अभिनय कसा असावा..याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे डॉ. गिरीश कर्नाड.

दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मराठीत त्यांनी काही मोजक्याचं कलाकृती केल्या..मात्र त्या प्रत्येक कलाकृतीने आपली एक वेगळी छाप उमटवली..शब्दांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या गिरिश कर्नाड यांच्या लेखनीचे अनेक दिग्गज दिग्दर्शकही चाहते होते.

एनएसडीचे अलकाजी, प्रसन्ना, पं सत्यदेव दुबे, अरविंद गौर, विजया मेहता असे रंगभूमीला वाहून घेतलेले नाट्यकर्मी गिरिश कर्नाड यांच्या अगदी प्रेमात होते. त्यामुळे शब्दांची जादूई किमया कागदावर उतरवून सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यामध्ये खिळवून ठेवणं हेच त्यांचं खास वैशिष्टय. कोणताही विषय थेटपणे मांडण्यात ते कधी घाबरले नाहीत.

बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये तुघलक आणि हयवदन हे नाटकं भाषांतरीत करण्यात आली..गिरिश कर्नाड यांची मातृभाषा ही कोकणी. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमात झालं.

पुढे कर्नाड कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाल्यामुळे त्यांनी बहुतांश लेखन हे कन्नड भाषेत केलं. ऑक्सफर्डध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या गिरिश कर्नाड यांनी शिकागो विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणूनही विद्यार्थांना धडे दिले. मात्र मायभूमीच्या ओढीने गिरिश कर्नाड भारतात परतले, आणि इथल्या नाट्यविश्वात ते रममान झाले.

शिक्षण काही कालावधी पुण्यात गेल्यामुळे बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपनीची नाटकं यांच्या ते प्रेमात होते. तिथेचं कदाचित त्याच्यात नाट्यलेखनाची बीज रोवली गेली.

गिरिश कर्नाड यांनी मराठीशी आपली नाळ कायमचं जोडून ठेवली. आडाडता आयुष्य म्हणजेच खेळता खेळता आयुष्य या नावाने त्यांनी कानडी भाषेत लिहिलेलं आत्मचरित्र त्यांच्या प्रवासाची खरी कहाणी सांगून जाते.

नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट तर युनिव्हसिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियाने डि.लीट पदवी देऊन सन्मान केला.. जागतिक रंगभूमीचे राजदूत म्हणून युनेस्कोने त्यांची निवड केली होती.

गिरिश कर्नाड यांचा पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या शब्दांच्या मैफलीने वेगळ्याचं दुनियेत नेणाऱ्या या मनस्वी नाट्यकर्मीच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वात हळहळ व्यक्त झाली.

अभिनयातही वेगळा ठसा 
नाटककार दिग्दर्शक साहित्यिक म्हणून गिरिश कर्नाड सर्वांना परिचित होतेच. हिंदी, मल्ल्याळम, तेलुगू, तामिळ, मराठी अशा सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या
मात्र एक अभिनेता म्हणून त्यांनी काही मोजक्याचं पण प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या.

गिरीश कर्नाड म्हटलं की त्यांचा मराठी प्रेक्षकांना आठवतो तो उंबरठा चित्रपट. १९८२ मध्ये डॉ.जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता..त्यात स्मिता पाटील यांचा कणखर अभिनय आणि जोडीला गिरीश कर्नाड यांचा पडद्यावरील संयमित वावर हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट ठरलं.

हिंदीसह मल्ल्याळम तेलुगू तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये गिरिश कर्नाड यांनी आपल्या अभिनयाची सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये छाप उमटवली.

नाटकांवर मनस्वी प्रेम कऱणारे गिरिश कर्नाड चित्रपटांच्या दुनियेतही कायमच आपली एक वेगळी छाप उमटवून गेले...मग तो इक्बालसारखा चित्रपट असेल किंवा एक था टायगर सारखा चित्रपट असेल..बॉलीवूडच्या मसालेदार चित्रपटांमध्येही त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व जपलं होतं.

नागेश कुकुनूर दिग्दर्शित इक्बाल हा चित्रपट त्याचचं एक उदाहरण म्हणता येईल. सलमान खानच्या 'एक था टायगर'मधील त्यांची भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती.
एकमागून एक भारंभार चित्रपट करण्यापेक्षा मनाला रुचतील पटतील अशाच भूमिका करणं त्यांनी कायम पसंत केलं.

मराठीतील शेवटचा चित्रपट ठरला तो सरगम. शिवकुमार कदम दिग्दर्शित या चित्रपटात ते एका खास भूमिकेत असणारेत. हा चित्रपट सध्या सेन्सॉरच्या कात्रीत अडकलाय.