आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला

IPL 2024 Punjab Kings : आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून पंजाब किंग्स बाहेर पडली आहे. पण शेवटच्या सामन्याआधी पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड घडली आहे. पंजाब किंग्स व्यवस्थापनाने संघात नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

राजीव कासले | Updated: May 18, 2024, 04:57 PM IST
आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला title=

Punjab Kings News Captain : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादने प्ले ऑफमधलं (IPL Play Off) आपलं स्थान पक्कं केलंय. तर मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांचा पत्ता कट झालाय. यापैकी पंजाब किंग्सचा (Punjab Kings) लीगमधला शेवटचा सामना बाकी आहे. पण त्याआधीच संघात मोठी घडामोड घडलीय. पंजाब किंग्स व्यवस्थापनाने संघासाठी नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे. 19 मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 69 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदाराबाद आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यात सॅम करन (Sam Curran) संघाचं नेतृत्व करणार नाही.

पंजाबचा कर्णधार बदलला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सला तिसरा कर्णधार मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला शिखर धवनकडे पंजाबचं नेतृत्व सोपण्यात आलं होतं. पण शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने पुढच्या संपूर्ण हंगामात तो खेळू शकला नाही. त्यामुळे शिखरच्या जागी पंजाबच्या कर्णधारपदी सॅम करनची नियुक्ती करण्यात आली. पण आता शेवटच्या लीग सामन्यात सॅम करनऐवजी तिसऱ्या कर्णधाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबचा विकेटकिपर-फलंदाज जितेश शर्माकडे (Jitesh Sharma) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

जितेश शर्माकडे नेतृत्व
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्सचा लीगमधला आपला शेवटचा सामना 19 मे रोजी खेळणार आहे. या सामन्यात जितेश शर्मा पंजाब किंग्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. 30 वर्षांचा जितेश शर्मा पहिल्यांदाच पंजाबचं नेतृत्व करणार आहे. पंजाब किंग्स याआधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलीय. 13 सामन्यांपैकी पंजाब किंग्सला पाच सामने जिंकता आले. पॉईंट टेबलमध्ये पंजाब नवव्या स्थानावर आहे. 

सॅम करन इंग्लंडला रवाना
पंजाब किंग्सचं नेतृत्व करणारा सॅम करन इंग्लंडला पोहोचला आहे. 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या संघात सॅम करनचाही समावेश आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश सघ टी20 वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारे इंग्लंडचे सर्व खेळाडू मायदेशी रवाना झाले आहेत. 

जितेशची आयपीएलमधली कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये जितेश शर्माची कामगिरी फारशी खास झालेली नाही. जितेशने 13 सामन्यात 122.05 च्या स्ट्राइक-रेटने केवळ 155 धावा केल्या आहेत. गेल्या आयपीएल हंगामात जितेशने दमदार कामगिरी कत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं होतं.  2023 आयपीएलमध्ये जितेशने 14 सामन्यात 309 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाच्या टी20 आंतरराष्ट्रीय संघातही स्थान मिळालं. जितेशने टीम इंडियासाटी 9 टी20 सामन्यात 100 धावा केल्या आहेत.