'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा

Mulund Rada : मुलुंडमधील राडा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.

राजीव कासले | Updated: May 18, 2024, 03:16 PM IST
 'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा title=

Mulund Rada Thackeray vs BJP : मुलुंडच राड्यानंतर शिवसैनिकांवर (Shivsena UBT) निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. भाजपच्या (BJP) वॉर रुममध्ये पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या ऑफिसबाहेर दाखल झाले. त्यावेळी ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते.

देवेंद्र फडणवीस मुलुंडमध्ये
या घटनेनंतर रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मिलिंद कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी घटनेचा आढावा घेत लिसांकडूनसविस्तर माहिती घेतली. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी फडणवीस यांच्याबरोबर भाजप नेते प्रसाद लाड हेदेखील उपस्थित होते. मिलिंद कोटेचांना जनतेचं समर्थन मिळतंय. त्यामुळे ठाकरे गटाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे असे खोटे आरोप केले जात असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. अशाप्रकारे कार्यकर्त्यावर आरोप होतो तेव्हा कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी, त्याला साथ देण्यासाठी उपमुख्यमंत्री आल्याचे ते म्हणाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेवर हल्ला केला, आरोपींवर गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांचा इशारा
दरम्यान, मुलुंड शिवसेना-भाजप राड्याप्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय. आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला आहे. ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नाव द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केलीय. ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी धाड टाकत पैसे पकडून दिले तेव्हा फडणवीस स्वत: धावून गेले आणि या पैसेवाल्यांना वाचवलं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना अत्यंत बेरहमीने पोलिसांनी मारहाण केली. त्या पोलिसांचे नावे मी जाहीर करणार आहे. सत्ता बदलल्यावर यांचे काय करायचे बघू असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भाजपचा जाहिरनामा हा खावोवादी आहे.जावू तिकडे खावू अशी घाणेरडी नियत आहे. आरएसएसवर ते बंदी आणतील.गरज सरो वैद्य मरो हा मोदींचा मनसुबा असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
घटनाबाह्य पद्धतीने ज्यांनी मुख्यमंत्रीपद बळकावलंय त्यांच्या मताला मी कवडी काय काडीचीही किंमत देत नाही, जे भाजपची स्क्रिप्ट घेवून बोलतात त्यांना मी काय उत्तर देवू अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.  जैन आणि उत्तर भारतीयांवर हल्ले करणाऱ्यांना मोदी सोबत घेतायत.त्यामुळं मुंबई आणि युपीतही भाजपचा सुफडासाफ होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.