चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं? 

विशाल करोळे | Updated: May 16, 2024, 08:58 AM IST
चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ Loksabha election 2024 farmer deaths due to suicide rosed to 267 during election period

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातच नव्हे, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये लहानातल्या लहान नेत्यापासून दिग्गजांपर्यंत अनेकांनीच हजेरी लावली आणि पाहता पाहता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्दे प्रकाशात आले. एकिकडे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच या धामधूमीत दाहक वास्तव समोर आलं आणि नेमकी परिस्थिती मन विषण्ण करून गेली. कारण, निवडणुकीच्या या धामधुमीतच एकट्या मराठवाड्यात 1 जानेवारी 2024 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत जवळपास 267 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 
 
निवडणुकीच्या निमित्तानं ज्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रचारसभा झाल्या तिथंच 59 शेतकऱ्यांनी आयुष्याचा दुर्दैवी अंत केला आणि या विचित्र, नकारात्मक कारणासाठी हा जिल्हा यादीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. प्रचाराच्या दौऱ्यांदरम्यान शेतमालाला मिळणारा कमी दर, भावामध्ये सातत्यानं सुरु असणारी घसरण या आणि अशा मुद्द्यावरही चर्चा झाली, आता मात्र बळीराजाला या प्रश्नांवर तोडगा काढला जाण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठीचं सरकार अशा घोषणा सध्या सर्वत्र ऐकण्यास मिळत असल्या तरीही अवकाळी, गारपिटीचा मारा याशिवाय इतरही संकटं शेतकऱ्यापुढं आव्हानांचा डोंगर वाढवताना दिसत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 

इथं शेतकऱ्यांपुढं असणाऱ्या समस्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसतानाच आता निसर्गानंही या बळीराजावर अवकृपा दाखवणं सुरुच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, सध्या मराठवाड्यातील पाणीपातळी घसरली असून इथं टँकरची संख्या 1578 इतकी झाली आहे. तर तिथं जायकवाडीनंही तळ गाठला आहे. इथं पाण्याची पातळी 6.14 टक्क्यांपर्यंत उतरली असून, साधारण महिना - दीड महिन्यासाठी पुरेल इतराच पाणीसाठी या धरणात असल्याचं म्हटलं जात आहे. 

मराठवाड्यात किती शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य? 

छत्रपती संभाजी नगर 44
नांदेड 41
बीड 59
लातूर 27
धाराशिव 42
जालना 29
परभणी 12
हिंगोली 13
एकूण 267

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा 

सोलापुरात दुष्काळ 

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायला सुरुवात झाली आहे. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यातील अनेक विहिरी, तलाव, धरण, नद्या अक्षरशः कोरड्या ठाक पडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. गेल्या वर्षी देखील इथं समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे मे महिन्यातच सोलापूरकरांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. एकीकडे अवकाळी पावसाचा सामना तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाईचा फटका बळीराजाला देखील बसताना दिसून येतोय.