'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: "मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली."

स्वप्निल घंगाळे | Updated: May 16, 2024, 07:36 AM IST
'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात title=
ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल (फाइल फोटो)

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. "गोंदियाचे प्रफुल पटेल यांनी काशीला जाऊन मोदी यांना शिवरायांप्रमाणे जिरेटोप घातला. हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर नीट बसला की नाही ते त्यांनाच माहीत. मात्र हेच पटेल दाऊद इब्राहिमचे साथीदार इक्बाल मिर्चीचे हस्तक असल्याचा आरोप याच मोदी यांनी उघडपणे केला होता. आता त्याच ‘मिर्ची मियाँ’ पटेलांकडून मोदी यांनी स्वतःच्या डोक्यावर जिरेटोप चढवून घेतला. हा महाराष्ट्राचा व छत्रपती शिवरायांचा अपमानच म्हणावा लागेल," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

नीतिमान भाजपचे काय म्हणणे

"मोदी हे प्रतिशिवाजी आहेत व छत्रपती शिवरायांप्रमाणे ते महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करतील अशा भ्रमात त्यांचे लोक असतील तर ते तितकेसे खरे नाही. पुन्हा या जिरेटोपाखालचे डोके महाराष्ट्राच्या बाबतीत प्रामाणिक नाही. महाराष्ट्राविरुद्ध अनेक कारस्थाने त्या डोक्यात घोळत असतात. मराठी माणसाच्या बाबतीत द्वेषाचे विष ज्या डोक्यात उकळत असते त्या डोक्यावर शिवरायांप्रमाणे जिरेटोप चढवून गोंदियाच्या पटेलांनी काय साधले? दाऊदचा हस्तक मिर्ची याच्याशी व्यावहारिक संबंध असल्याचा ठपका ‘ईडी’ वगैरे संस्थांनी याच पटेलांवर ठेवला होता. त्यामुळे पटेलांची शे-पाचशे कोटींची संपत्ती जप्त केली गेली. त्याच पटेलांकडून मोदी यांनी स्वतःचा सन्मान करून घेतला. काशीच्या पवित्र नगरीत हे घडले. यावर नीतिमान भाजपचे काय म्हणणे आहे?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'

आमच्या दैवतांचा आणि हिंदुत्वाचा अपमान

"मोदी-शहांच्या डोक्यावर शिवकालीन पगड्या घातल्या तरी त्यांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे काही शांत होणार नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या बाबतीत यांच्या डोक्यात काही शुद्ध प्रामाणिक विचार नाहीत. संविधान बदलायचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच आहे. शिवरायांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राचा मर्दानी बाणा त्यांच्या डोळ्यात खुपत आहे व डोक्यात त्याबाबत कारस्थाने आहेत. अशा डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप ठेवणे म्हणजे लटकत्या आत्म्यांचा जिहादच आहे. आमच्या दैवतांचा आणि हिंदुत्वाचादेखील हा अपमान आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.